हिवाळ्यातील सांधेदुखी आणि उपाय

हिवाळा सुरू झाला की अनेकांना संधीवाताचा त्रास सुरू होतो. यात प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सांधे आखडणे, सांध्यांना सूज येणे, तोंड कोरडे पडणे असा त्रास होतो. अशावेळी शरीराला उष्णता मिळणे गरजेचे असते. हिवाळ्यातील थंडी ही स्नायूंना बाधणारी असते. त्यामुळे शरीर कडक होते. त्याचा अतिरिक्त दबाव हाडांवर पडतो त्यामुळे या दिवसात गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अशी हाडांची दुखणी डोकं वर काढतात. विशेष करुन संधीवाताचा त्रास असणाऱ्यांना हिवाळ्यात सर्वाधिक त्रास होतो. पण काही ठराविक खबरदारी घेतल्यास हिवाळ्यातील शारीरीक त्रास टाळता येतात. त्यासाठी काय करावे ते बघूया.

शरीर गरम ठेवणे
हिवाळ्यातील थंडगार हवेमुळे स्नायू आणि सांधे गारठतात. त्य़ामुळे या दिवसात घराबाहेरच नाही तर घरातही गरम, ऊबदार कपडे घालावेत. या दिवसात गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्नायूंनाही आराम मिळतो. वेदना होत नाहीत.शरीर जितके उष्ण राहील तितके चांगले.

हालचाल
थंडीच्या दिवसात सकाळी जीमला जाणे, वॉकला जाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी थंडी आहे म्हणून व्यायाम करणे टाळू नये. उलट बॉडी स्ट्रेचिंग करावे, थोडे चालावे. बाहेर जाणे शक्य नसेल तर घरातल्या घरातच चालावे. त्यामुळे नसा मोकळ्या होतात. सांधे लवचिक होतात.

वजन
थंडीच्या दिवसात भूक कमी लागते. घाम येत नाही त्यामुळे तहानही लागत नाही. त्यातच या दिवसात सणही असतात. त्यामुळे गोडाधोडाचे खाऊन वजन वाढते. यामुळे या दिवसांमध्ये तेलकट, तूपकट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे टाळावे. आहारात ताज्या फळभाज्या, पालेभाज्या, सलाड, सिझनल फळ,डाळी घ्याव्यात. बेरीज, ड्राय फ्रूट्स, मासे , लसूण यांच्या सेवनाने सांध्यावर आलेली सूजही कमी होते.

पाणी
थंडीत तहान जरी कमी लागत असली तर पाणी पित राहावे. अन्यथा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. शऱीरात पाणी कमी झाल्यास सांध्यामधील वंगण कमी होते. यामुळे पाण्याबरोबरच तुम्ही हर्बल टी, सूप, ज्यूस प्यावे. त्यामुळे शरीर हायड्रेड राहते. सांधेदुखी टळते.

वेदना

जर थंडीच्या सुरुवातीलाच तुम्हांला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर सावध व्हा. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Comments are closed.