Online Payment Fraud: सावधान! तुमच्या Gpay व ऑनलाईन पेमेंटवर हॅकर्सची नजर
फास्ट पेमेंट आणि डिजिटल व्यवहार वाढल्यानंतर आपलं दैनंदिन जगणं अगदी सोपं झालं आहे. पण याच डिजिटल सोयींचा गैरफायदा घेऊन फसवणूक करणाऱ्यांचं प्रमाणही वेगानं वाढत आहे. विशेषत: QR कोड स्कॅन करून पेमेंट करणाऱ्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या फसवणुकीच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. Only Manini ला दिलेल्या मुलाखतीत सायबर तज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की दुकानदार, हातगाडीवाले, फळविक्रेते, भाजीविक्रेते अशा छोट्या विक्रेत्यांकडे असलेले QR कोड आता फसवणुकीचं मोठं माध्यम बनत आहेत. (online payment qr code fraud how hackers use trick)
QR कोड स्कॅन करताना सावधान!
अनेक ठिकाणी पाहायला मिळतं की छोट्या दुकानांसमोर QR कोड साध्या कागदावर प्रिंट करून लावलेले असतात. हे कोड रात्री दुकान बंद झाल्यावर काही फसवे लोक सहजपणे बदलतात. मूळ QR कोडवर स्वतःचा QR कोड चिकटवतात. ग्राहक दुसऱ्या दिवशी व्यवहार करताना तो कोड स्कॅन करतात आणि त्यांना वाटतं की पैसे दुकानदाराला गेले. पण प्रत्यक्षात ते पैसे थेट फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात जातात.
‘GPay कराल आणि रिकामे व्हाल’
डॉ. देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी आणखी गंभीर प्रकार घडतो. दुकानात ग्राहकांना इकडचं तिकडचं सामान काढायला लावून त्यांचे लक्ष विचलित केले जाते आणि तेव्हाच QR कोड असलेली स्टँड बोर्डच बदलून ठेवली जाते. ग्राहक पेमेंट करतो, दुकानदारालाही वाटतं की पैसे आले, पण व्यवहार चुकीच्या खात्यात जातो. याहून धोकादायक प्रकार म्हणजे काही QR कोडमध्ये हानिकारक फायली आणि मालवेअर टाकलेले असतात. असा कोड स्कॅन केला तर केवळ पैसेच नाही तर मोबाइलचा पूर्ण कंट्रोलही फसवणूक करणाऱ्याकडे जाऊ शकतो. मोबाइलमधील फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, कॉन्टॅक्ट्स यांचा गैरवापर केला जाऊ शकतो.
त्याचबरोबर डॉ. देशपांडे सांगतात की पूर्णपणे कॅशलेस होणं धोकादायक ठरू शकतं. किराणा किंवा घरातील मोठे मासिक खर्च कॅशने करणे अधिक सुरक्षित आहे. आवश्यक तेवढेच ऑनलाईन पेमेंट करावेत, आणि नेहमी ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी.पेमेंट करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट स्क्रीनवर दिसणारं नाव नीट वाचणं. अनेक लोक घाईत ते चेक करतच नाहीत. एकदा नाव जुळतंय का ते पाहिल्यानंतरच पुढील स्टेप करावी.
‘ऑफिस आवर्समध्ये पेमेंट करू नका’
ऑनलाईन व्यवहार करताना आणखी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे फिक्स रक्कम जसे घरभाडं, दुकानभाडं, महिन्याचा खर्च अशा रकमा ऑफिस अवर्समध्ये करू नयेत. कारण दिवसभर हॅकर्सही सर्वाधिक सक्रिय असतात. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळेत ऑनलाइन फसवणूक तुलनेने कमी असते. त्यामुळे त्या वेळेला पेमेंट केल्यास धोका कमी राहतो.
ऑनलाईन पेमेंट्सदरम्यान योग्य खबरदारी घेतली, तर अनेक फसवणुकांपासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. पण निष्काळजीपणा दाखवला तर एका स्कॅनमुळे आर्थिक तसेच वैयक्तिक गोपनीयतेचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
Comments are closed.