Samantha Ruth Prabhu : समांथा नवा नवरा राज निदिमोरु आहेत तरी कोण?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारणही तसंच मोठं आहे. समंथाने शिवधनुष्य उचलत पुन्हा लग्न केले असून तिचा जोडीदार आहे राज निदीमोरु. काही दिवसांपासून समंथा आणि राज यांच्या नात्याच्या चर्चांना जोर आला होता. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दोघांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. (samantha raj nidimoru marriage who is raj nidimoru details)

समंथाचं पहिलं लग्न 2017 मध्ये अभिनेता नागा चैतन्य सोबत झालं होतं. मात्र, हे नातं फार काळ टिकले नाही आणि 2021 मध्ये दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला. नागाने नंतर शोभिता धुलिपालासोबत संसार थाटला. या काळात समंथा कठीण मानसिक टप्प्यातून गेली होती. मात्र, वेळेनुसार सगळं सावरत तिने पुन्हा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली. आणि आता ती नव्या नात्यात आनंदी आहे.

कोण आहे राज निदिमोरू?
राज निदीमोरु हे चित्रपटसृष्टीतील नावाजलेले निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून ओळखले जातात. ते ‘राज अँड डीके’ या जोडीचा भाग असून त्यांनी अनेक लोकप्रिय प्रकल्पांवर काम केलं आहे. ‘द फॅमिली मॅन’, ‘फर्जी’, ‘सिटाडेल: हनी बनी’ यांसारख्या मोठ्या मालिका आणि ‘गो गोवा गॉन’, ‘शोर इन द सिटी’ असे चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

समंथा आणि राज यांची जवळीक ‘द फॅमिली मॅन’ च्या शूटिंगदरम्यान वाढली. समंथाने या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती आणि त्यावेळी दोघांमध्ये चांगली मैत्री जमली. पुढे हे नातं अधिक दृढ होत गेलं आणि अखेर 1 डिसेंबर 2025 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले.

राज यांची करिअरची सुरुवात कशी झाली?
राज निदीमोरु यांचा जन्म तिरुपती, आंध्र प्रदेश येथे झाला. त्यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ अमेरिकेत वास्तव्य केलं. तिथे टेक क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे चित्रपट क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. कृष्णा डीके सोबत मिळून त्यांनी पहिला चित्रपट ‘फ्लेव्हर्स’ तयार केला. हा चित्रपट जगभरातील भारतीय समुदायात लोकप्रिय झाला.

त्यांच्या निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखनशैलीला वेगळं स्थान मिळालं. भारतीय OTT प्लॅटफॉर्मवर ‘द फॅमिली मॅन’ सारख्या मालिकांनी त्यांना विशेष ओळख दिली.

राज यांचा पहिला संसार
राज निदीमोरु यांनी 2015 मध्ये श्यामाली डे यांच्याशी लग्न केले होते. दोघे जवळपास सात वर्षे एकत्र होते, मात्र 2022 मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. श्यामाली यांनी चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक आणि पटकथा सल्लागार म्हणून काम केलं आहे. दरम्यान समंथाने तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देत आहेत. दोघांचं हे नातं त्यांच्या आयुष्यात एक नवा अध्याय लिहित आहे. अनेक अडचणींना सामोरं गेल्यानंतर समंथाला पुन्हा आनंद सापडला आहे हे पाहून तिचे चाहतावर्गही खुश आहे.

Comments are closed.