Varadraj Perumal Temple: ‘या’ मंदिरात करतात पालीची पूजा; ४० वर्षे तलावात असते विष्णूची मूर्ती

भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या प्रत्येक मंदिरांचा वेगवेगळा इतिहास आणि प्रथा- परंपरा आहेत. अनेक मंदिरे तर रहस्यमयी मानली जातात. असेच एक मंदिर तामिळनाडूतील कांचीपुरम इथं आहे. या मंदिरात चक्क पालीची पूजा केली जाते. विष्णूच्या या मंदिराला वरदराज पेरुमल मंदिर म्हणून ओळखलं जातं. मात्र इथं पाल पूज्य असल्यानं या मंदिराला ‘टेम्पल ऑफ लिझार्ड’ असंही म्हंटलं जातं. ( Kanchipuram Varadraj Perumal ( Temple Of Lizards ) Story )

कांचीपुरममधील हे मंदिर भगवान विष्णूंना समाप्रित आहे. मंदिराच्या छतावर एक सोनेरी आणि चांदीच्या पालीची आकृती आहे. तसेच त्या शेजारी सूर्य आणि चंद्रही पाहायला मिळतात. अशी मान्यता आहे की, या पालींना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने सर्व पापांपासून मुक्ती होते आणि जीवनातील आर्थिक अडचणी कमी होतात. याच कारणामुळं लोक दूरहून या मंदिरात दर्शनासाठी येतात आणि तासंतास रांगेत उभं राहतात.

पौराणिक कथा
धार्मिक श्रद्धेनुसार, प्राचीन काळी यादवांना येथील एका विहिरीत एक मोठी पाल दिसली. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना याबाबत कळलं तेव्हा त्यांनी ही पाल विहिरीतून बाहेर काढली. श्रीकृष्णाच्या स्पर्शाने पालीचे मनुष्यात रूपांतर झालं. तेव्हा त्या मनुष्याने श्रीकृष्णाला सांगितलं की तो एक राजा आहे आणि एका ब्राह्मणाने त्याला पाल होण्याचा शाप दिला होता.

वरदराज पेरुमल मंदिराची निर्मिती १०५३ मध्ये झाल्याचं सांगितलं जातं. १०५३ नंतर काही वर्षांनी चोल साम्राज्याचे राजे कुलोथुंगा चोल आणि विक्रम चोल यांनी मंदिराचा विस्तार केला आणि त्याला भव्य स्वरूप मिळालं. मंदिरात भगवान विष्णूंची एक दुर्मिळ लाकडी मूर्ती आहे. या मूर्तीचं खास वैशिष्ट्ये म्हणजे ही मूर्ती दर ४० वर्षांनी फक्त ४८ दिवस दर्शनासाठी बाहेर काढली जाते. उर्वरित काळ ती एका तलावात असते. मात्र इतके दिवस तलावात असूनही या लाकडाच्या मूर्तीचं कधीही नुकसान होत नाही. वरदराज पेरुमल मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या काळात देवाची भव्य रथयात्रा काढली जाते. तसेच इथं वैकुंठ एकादशी, दिवाळी आणि पोंगलसारखे सण देखील मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.

Comments are closed.