Fact Check : उकळत्या पाण्यात टाकताच तयार होणारी ‘कॅप्सूल मॅगी’, व्हायरल व्हिडिओमागे नेमकं सत्य काय?

सोशल मीडियावर दररोज नवनव्या कल्पना, प्रयोग आणि ट्रेंड्स समोर येत असतात. काही गोष्टी माहितीपूर्ण असतात, तर काही केवळ मनोरंजनासाठी असतात. मात्र काही व्हिडीओ असेही असतात जे पाहणाऱ्यांची दिशाभूल करतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यात “कॅप्सूल मॅगी” बाजारात आल्याचा दावा केला जात आहे. (capsule maggi viral video truth india fact check)

या व्हिडीओमध्ये एक छोटीशी कॅप्सूल उकळत्या पाण्यात टाकली जाते आणि काही क्षणांतच त्या पाण्यातून मॅगी नूडल्स तयार होताना दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं असून “आता मॅगी गोळीच्या रूपात मिळते का?” असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

व्हायरल व्हिडीओचा दावा काय सांगतो?
व्हायरल व्हिडीओमध्ये औषधाच्या गोळीसारखी दिसणारी कॅप्सूल गरम पाण्यात टाकल्यावर ती फुटते आणि त्यातून नूडल्स बाहेर येतात. काही सेकंदांत मसाला आणि भाज्या घालून पूर्ण मॅगी तयार झाल्याचं दाखवलं जातं. हा सीन इतका नीट सादर करण्यात आला आहे की तो प्रत्यक्षात घडतोय असा भास होतो. पण या व्हिडीओचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही.

कॅप्सूल मॅगी खरंच शक्य आहे का?
सध्या मॅगी किंवा इतर कोणत्याही नूडल्स बनवणाऱ्या कंपनीकडून अशा प्रकारचं उत्पादन बाजारात आणल्याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. नूडल्सचा आकार, त्यासाठी लागणारी जागा आणि शिजवण्याची प्रक्रिया लक्षात घेतली तर, इतक्या छोट्या कॅप्सूलमध्ये संपूर्ण मॅगी तयार होणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. व्हिडीओमधील दृश्ये बारकाईने पाहिली असता, ती तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेली असल्याचं दिसून येतं.

असे बनावट व्हिडीओ का तयार केले जातात
आज AI आणि एडिटिंग टूल्समुळे कल्पनाशक्तीला वास्तवाचं स्वरूप देणं खूप सोपं झालं आहे. “काहीतरी नवीन”, “अविश्वसनीय प्रयोग” किंवा “झटपट तयार होणारे पदार्थ” अशा विषयांवर लोक लगेच प्रतिक्रिया देतात आणि व्हिडीओ पुढे पाठवतात. याच उत्सुकतेचा फायदा घेत असे फेक व्हिडीओ व्हायरल केले जातात.

त्यामुळे कोणताही व्हिडीओ व्हायरल झाला म्हणजे तो खरा असेलच असे नाही. अशा दाव्यांची खात्री नेहमी अधिकृत स्रोत, कंपनीची वेबसाईट किंवा विश्वासार्ह बातमी माध्यमांमधून करून घ्यावी.

दरम्यान, उकळत्या पाण्यात टाकताच तयार होणारी “कॅप्सूल मॅगी” ही केवळ सोशल मीडियावर पसरवलेली कल्पना आहे. हा व्हिडीओ वास्तव नाही, तर AI तंत्रज्ञानातून तयार झालेला फसवा कंटेंट आहे. याआधीही कॅप्सूलमधून डाळभात, भाजी किंवा इतर पदार्थ तयार होतात असे व्हिडीओ व्हायरल झाले होते आणि ते सर्व खोटे ठरले आहेत.

Comments are closed.