Packaged Drinking Water : बिस्लेरी, अॅक्वाफिना ‘मिनरल वॉटर’ नाही, 99% लोकांना माहित नाही पॅकेज्ड ड्रिंकमधला फरक
उन्हाळा असो, लांबचा प्रवास असो किंवा रोजची धावपळ असो, तहान लागली की आपल्या हातात हमखास पाण्याची बाटली येते. काही जण घरून पाणी नेतात, पण अनेक वेळा बाहेरून बाटलीबंद पाणी घ्यावं लागतंच. अशावेळी दुकानात गेल्यावर बहुतेक लोक सहज म्हणतात, “एक मिनरल वॉटर द्या.” आणि समोरून जी बाटली मिळते, ती बहुतांश वेळा बिस्लेरीचीच असते. त्यामुळे आपल्या मनात एक ठाम समज तयार झालेला आहे की बिस्लेरी म्हणजे मिनरल वॉटर. (bisleri mineral water or packaged drinking water difference)
पण प्रत्यक्षात सत्य वेगळंच आहे. बिस्लेरी हे मिनरल वॉटर नाही. हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल, कारण वर्षानुवर्षे आपण हा शब्द वापरत आलो आहोत. मात्र कायदेशीर आणि तांत्रिक भाषेत पाहिलं तर बिस्लेरीसह अनेक प्रसिद्ध ब्रँड हे मिनरल वॉटरच्या श्रेणीत येतच नाहीत.
बिस्लेरी स्वतःला काय म्हणते?
महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिस्लेरीने कधीही स्वतःला “मिनरल वॉटर” असं घोषित केलेलं नाही. त्यांच्या बाटलीवर स्पष्टपणे “Packaged Drinking Water” असंच लिहिलेलं असतं. पण ग्राहकांच्या सवयीमुळे आणि बोलण्यातून “मिनरल वॉटर” हा शब्द इतका रूढ झाला आहे की हा फरक कुणी लक्षातच घेत नाही.
पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर म्हणजे काय?
पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर म्हणजे कोणत्याही स्त्रोताचं पाणी शुद्ध करून बाटलीत भरलेलं पाणी. हे पाणी नळातून, विहिरीतून किंवा इतर स्रोतांमधून घेतलं जाऊ शकतं. त्यानंतर ते अनेक टप्प्यांत शुद्ध केलं जातं. या प्रक्रियेत पाण्यातील जंतू, घाण आणि अपायकारक घटक काढून टाकले जातात. यामध्ये आरओ प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या प्रक्रियेत पाणी स्वच्छ होतं, पण त्याचबरोबर नैसर्गिक खनिजांचं प्रमाणही कमी होतं. म्हणून नंतर त्यात काही खनिजे बाहेरून मिसळली जातात.तर बिस्लेरी, किन्ले, अॅक्वाफिना, बेली, रेल नीर यांसारखे ब्रँड याच पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर या प्रकारात मोडतात.
मग नॅचरल मिनरल वॉटर म्हणजे काय?
नॅचरल मिनरल वॉटर हे थेट भूगर्भातील नैसर्गिक झऱ्यांमधून मिळतं. या पाण्यावर फारशी प्रक्रिया केली जात नाही. फक्त गाळ काढणे आणि स्वच्छता इतकंच केलं जातं, जेणेकरून पाण्यातील नैसर्गिक खनिजे जशीच्या तशी टिकून राहतात. या पाण्यात खनिजे बाहेरून घातलेली नसतात, ती नैसर्गिकरित्या असतात. त्यामुळे या पाण्याची चव, गुणवत्ता आणि पोषणमूल्य वेगळी असते.
बाटलीवरचा एक कोड सगळं सांगतो
पुढच्या वेळी पाण्याची बाटली खरेदी करताना लेबल नीट पाहा. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरवर IS 14543 असा कोड असतो. तर नॅचरल मिनरल वॉटरवर IS 13428 असा वेगळा कोड दिलेला असतो. हा छोटासा फरक तुम्हाला पाण्याचा प्रकार ओळखायला मदत करू शकतो.
मग बिस्लेरी पिणं चुकीचं आहे का?
अजिबात नाही. बिस्लेरी आणि इतर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँड हे पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात. ते सर्व आवश्यक मानके पूर्ण करतात. मात्र त्यांना वैज्ञानिक आणि कायदेशीर दृष्ट्या नॅचरल मिनरल वॉटर म्हणता येत नाही, इतकाच मुद्दा आहे. आपण वर्षानुवर्षे वापरत असलेला “मिनरल वॉटर” हा शब्द सवयीमुळे चुकीच्या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे पुढच्या वेळी पाण्याची बाटली हातात घेताना, आपण नेमकं काय पितोय हे समजून घेणं महत्वाचं आहे.
Comments are closed.