Major Controversies 2025: देवाची नक्कल, जीवघेणा हल्ला ते मोडलेलं लग्न; कॉन्ट्रोवर्सीने हादरलं २०२५ वर्ष

Year Ender 2025: २०२५ हे वर्ष बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी संमिश्र ठरलं. या वर्षी अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तर काही चित्रपट फ्लॉप ठरले. अनेक प्रसंगी वाद निर्माण झाल्याने त्याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर झाला. तसेच अनेक बॉलिवूड स्टार्स आपल्या वर्तनामुळं वादात अडकले. चला तर मग सरत्या वर्षानिमित्त बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील सर्वात गाजलेल्या कॉन्ट्रोवर्सी जाणून घेऊया… ( Major Bollywood and Marathi film industry controversies of 2025 )

दीपिका पदुकोण (दीपिका पदुकोण 8 तासांच्या शिफ्टचा वाद)
बॉलिवूडबद्दल बोलायचं झाल्यास अभिनेत्री दीपिका पदुकोण ही तिच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीमुळं प्रचंड ट्रोल झाली होती. काहींनी तिच्या या मागणीचं समर्थन केलं तर काहींनी त्याला विरोध दर्शवला. खरं तर, अभिनेत्री दीपिका पादुकोणने फिल्म इंडस्ट्रीत सगळ्यांनाच ८ तासांची शिफ्ट असावी अशी मागणी केली होती. तिच्या या मागणीवर मेकर्स, कलाकार यांनी सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या.

रणवीर सिंग (रणवीर सिंग कांतारा मिमिक्री कॉन्ट्रोव्हर्सी)
अलीकडेच धुरंधर या चित्रपटामुळं चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या आणखी एका कृत्यामुळं चर्चेत राहिला. त्यानं गोव्यात झालेल्या IFFI २०२५ च्या समारंभात ‘कांतारा: चॅप्टर १’ चित्रपटाचं कौतुक करत असताना चित्रपटातील ‘दैव’ भूमिकेची नक्कल केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्याला अनेक स्तरातून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यानंतर त्यानं याप्रकरणी जाहीर माफी मागितली होती.

सैफ अली खान (सैफ अली खान हल्ल्याचा वाद)
वर्षाची सुरूवातच बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर धक्कादायक हल्ल्याने झाली. १६ जानेवारी २०२५ रोजी सैफ अली खानवर अज्ञाताने हल्ला केला. मुंबईतील वांद्रे येथील सैफच्या निवासस्थानी ही घटना घडली. हा हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने शिरला होता. मात्र, सैफने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, दोघांमध्ये झटापट झाली. यात हल्लेखोराने सैफवर चाकूने वार केले. तेव्हा त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र या घटनेमुळं बॉलिवूडसह संपूर्ण देश हादरला होता. सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. तसेच मुंबई पोलिसांवरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

परेश रावल (परेश रावल हेरा-फेरी 3 वाद)
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल हे काही कारणास्तव बहुप्रतिक्षित ‘हेरा फेरी ३’ मधून अचानक बाहेर पडल्याची बातमी समोर आली. यामुळं चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. कायदेशीर कारवाईच्या अफवाही पसरल्या, पण नंतर पुन्हा परेश रावल चित्रपटात परतले.

काजोल (काजोलने हिंदीत बोलण्यास नकार दिला वाद)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल माध्यम प्रतिनिधींशी केलेल्या एका वर्तनामुळे चर्चेत आली होती. एका पुरस्कार सोहळ्यात काजोलने हिंदीत बोलण्यास नकार दिल्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं होतं.

संतोष जुवेकर (अक्षय खन्ना वादावर संतोष जुवेकर)
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने रायाजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत संतोषने सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता अक्षय खन्नाशी बोललोच नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

प्राजक्ता माळी ( Prajakta Mali And Suresh Dhas Controversy )
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी चर्चेत आली होती. कारण भाजप आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणी उल्लेख करताना प्राजक्ता माळीचे नाव घेतलं आणि वाद निर्माण झाला. नंतर प्राजक्ताने धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. तसेच पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली होती.

बॉलिवूड चित्रपटाचे वाद (छावा चित्रपट वाद)
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाला सुरुवातीला वादाचा सामना करावा लागला. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विक्की कौशलला लेजीम खेळताना दाखवण्यात आलं होतं. याला अनेकांनी विरोध दर्शवल्यानंतर चित्रपटातून ते दृश्य हटवण्यात आलं.

मराठी चित्रपट वादात ( Manache Shlok Movie Controversy )
तसेच ‘मनाचे श्लोक’ या मराठी चित्रपटाला विरोध आणि कायदेशीर आव्हानांना सामोरे जावे लागले, कारण लिव्ह-इन रिलेशनशिपची कथा असलेल्या या चित्रपटाला संत समर्थ रामदास स्वामी यांच्या पवित्र ग्रंथाचं नाव दिल्यानं वाद निर्माण झाला होता. यामुळं चित्रपट प्रदर्शित होऊनही अनेक ठिकाणी शो बंद पाडण्यात आले. नंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं नाव बदलून तो पुन्हा रिलीज केला होता. त्याचप्रमाणे ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप करत प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी (पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली वाद)
एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या प्राणघातक पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. त्यावेळी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली. तसेच पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट्स भारतीय युजर्ससाठी ब्लॉक करण्यात आले होते.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल (स्मृती-पलाशचा विवाह वाद रद्द)
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विवाहाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली येथे विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा सोहळा अनपेक्षित वळणांमुळे चर्चेचा विषय ठरला. विवाहाच्या अगदी एक दिवस आधी, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. यामुळं लग्न तात्पुरतं पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर पलाशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही अफवा पसरल्या. त्याने स्मृतीला धोका दिल्याचं म्हंटलं गेलं. अखेर ७ डिसेंबर २०२५ रोजी स्मृतीने अधिकृतपणे लग्न रद्द झाल्याचं जाहीर केलं. मात्र स्मृती- पलाशचं मोडलेलं लग्न हा कॉन्ट्रोवर्सीचा विषय ठरला.

Comments are closed.