Year Ender 2025: बॉलीवूड रेट्रो, को-ऑर्ड सेट ते इंडो-वेस्टर्न, विविध फॅशन ट्रेंडने गाजलं वर्ष
२०२५ या वर्षात फॅशन विश्वात अनेक नवनवीन ट्रेंड पाहायला मिळाले. ९० च्या दशकातील बॉलिवूडची विंटेज आणि रेट्रो फॅशन या वर्षी पुन्हा ट्रेंडमध्ये आली. तर इंडो- वेस्टर्न पॅटर्न, दैनंदिन वापरासाठी को-ऑर्ड सेटला महिलांनी अधिक पसंती दिली. सरत्या वर्षानिमित्त जाणून घेऊया २०२५ मधील ट्रेंडिंग फॅशन ट्रेंड्स… ( Year Ender 2025 Fashion Trends )
को-ऑर्डर सेट
मॅचिंग टॉप्स आणि बॉटम्स असलेले को-ऑर्ड सेट्स २०२५ मधील सर्वात मोठे फॅशन ट्रेंड बनले. अगदी घरापासून ते ऑफिस लूकसाठी हे आऊटफिट सर्वात जास्त लोकप्रिय ठरले. २०२५ मध्ये फॅशन ट्रेंड्सच्या यादीत को-ऑर्ड सेट्सचा क्रमांक पहिला येतो.
इंडो-वेस्टर्न
२०२५ मध्ये इंडो-वेस्टर्न फ्यूजन हा एक व्हायरल फॅशन ट्रेंड ठरला. इंडो-वेस्टर्न आऊटफिट पारंपारिक आणि पाश्चात्य शैलीचे परिपूर्ण मिश्रण आहेत, म्हणूनच त्यांना इंडो-वेस्टर्न असे नाव देण्यात आलं. सर्व वयोगटातील आणि सर्व प्रकारच्या शरीरयष्टीच्या महिलांनी हा फॅशन ट्रेंड स्वीकारला. पार्टी, लग्न, रिसेप्शनसाठी इंडो-वेस्टर्न आऊटफिट्सना सर्वाधिक पसंती मिळाली.
मोठ्या आकाराचे पोशाख
२०२५ मध्ये घट्ट कपड्यांचा ट्रेंड जवळपास संपल्याचं पाहायला मिळालं. या वर्षी आरामदायी ओव्हरसाईज्ड आउटफिट्स खूप लोकप्रिय ठरले. ओव्हरसाईज्ड टी-शर्ट्स, स्वेटशर्ट्स आणि कोरियन टॉप्सने या वर्षी फॅशन गेम बदलला आणि जेन झेड आणि मिलेनियल्सकडून ओव्हरसाईज्ड आउटफिट्सना पसंती मिळाली.
फ्लोरल प्रिंट्स आणि पोल्का डॉट्स
या वर्षी ड्रेसेस आणि शर्टमध्ये ७० च्या दशकातील फ्लोरल प्रिंट्स आणि पोल्का डॉट्स आऊटफिट पुन्हा फॅशनमध्ये आले. तर ८० च्या दशकातील बॉलिवूड रेट्रो लूक या वर्षी मोठ्या प्रमाणात फॉलो केला गेला. हा ट्रेंड अभिनेत्रींपासून ते सामान्य तरुणींमध्ये दिसून आला.
साडी
साडी हा भारतीय फॅशनचा सर्वात पारंपरिक भाग आहे. पण २०२५ मध्ये साड्यांना आधुनिक ट्विस्ट मिळाला. बेल्ट असलेल्या साड्या, पँट साडी आणि प्री-स्टिच साड्यांनी तरुणींना भुरळ घातली. पैठणी आणि नऊवारी साड्यांना मॉडर्न ब्लाऊजसोबत स्टाईल करण्याचा ट्रेंड महाराष्ट्रात गाजला.
इको- फ्रेंडली फॅशन
महिलांनी खादी, लिनन आणि हाताने विणलेल्या कपड्यांना पसंती दिली. यावर्षी बहुतांशदा इको- फ्रेंडली फॅशन ट्रेंड स्वीकारला गेला. पर्यावरणास पूरक असणाऱ्या आऊटफिट्सची क्रेझ यंदा वाढली.
मोनोक्रोमॅटिक मेकअप
फॅशन विश्वात ‘मोनोक्रोमॅटिक मेकअप’ या ट्रेंडने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. यामध्ये डोळे, गाल आणि ओठांसाठी एकाच रंगाच्या शेड्सचा वापर केला गेला. यामुळं चेहरा नैसर्गिक आणि तेजस्वी दिसतो. त्यामुळं २०२५ मध्ये लग्नकार्यात आणि सणासुदीला मोनोक्रोमॅटिक मेकअप लूक खूप लोकप्रिय ठरला.
Comments are closed.