Mikami Shrine Kyoto: भक्तीचा चमत्कारिक अनुभव; इथं पूजा केल्यावर टकल्यांना येतात केस

जगभरात अनेक मंदिर आहेत, ज्याचा वेगवेगळा इतिहास, रहस्य आहेत. खरं तर, मंदिरात भाविक नेहमी यश, सुख, शांतीसाठी प्रार्थना करतात. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगात असं एक मंदिर आहे जिथे केस गळती रोखण्यासाठी प्रार्थना करायला लोक येतात. जपानमध्ये हे मंदिर आहे. इथं केस गळतीने हैराण झालेले लोक येतात असं म्हंटलं जातं. ( mikami shrine kyoto temple, japan )

जपानच्या क्योटो शहरातील अरशियामा परिसरात प्रसिद्ध बांबूच्या जंगलाजवळ हे मंदिर आहे. मिकामी श्राइन असं या छोट्या मंदिराचं नाव आहे. सध्या सोशल मीडियावर या मंदिराची विशेष चर्चा रंगली आहे. कारण @shervin_travels नावाच्या एका युझरने इंस्टाग्रामवर या मंदिराबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. लोक या मंदिरात यशाची प्रार्थना करण्यासाठी नाही तर निरोगी केसांच्या प्रार्थनेसाठी येतात असं सांगण्यात आलं आहे.

मंदिराची स्थापना कधी झाली?
या मंदिराची स्थापना 1960 मध्ये झाल्याचं सांगितलं जातं. जपानचे पहिले केशरचनाकार मानले जाणारे फुजिवारा उनेमेनोसुके मासायुकी यांना हे मंदिर समर्पित असल्याचं म्हणतात. मासायुकी यांच्या कामामुळं जपानमधील लोकांनी त्यांना देवतेचा दर्जा दिला आहे. त्यामुळंच आजही मोठ्या संख्येने हेअर स्टायलिस्ट आणि ब्युटीशियन या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी येतात. तसेच जपानमधील हेअर सलूनचे मालक दर महिन्याच्या १७ तारखेला आपलं काम बंद ठेवून इथं मासायुकी यांची पुण्यतिथी साजरी करतात.

हेही वाचा: Varadraj Perumal Temple: ‘या’ मंदिरात करतात पालीची पूजा; ४० वर्षे तलावात असते विष्णूची मूर्ती

लिफाफ्यात ठेवतात केस
या मंदिरात प्रार्थना करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. इथं भाविक मंदिरातून एक विशेष प्रार्थना लिफाफा खरेदी करतात. पुजारी भाविकांचे थोडे केस कापून या लिफाफ्यात ठेवतात. त्यानंतर भाविक निरोगी आणि दाट केसांसाठी मासायुकी यांना प्रार्थना करतात. मग तो लिफाफा पूजारी घेतात आणि भाविकांच्या निरोगी केसांसाठी एक विशेष प्रार्थना करतात. दरम्यान, या अनोख्या चमत्कारिक अनुभवामुळं हे मंदिर जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे.

Comments are closed.