हनुमानाला शेंदूर का अर्पण करतात? जाणून घ्या त्रेता युगातील रंजक कथा आणि धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात हनुमानाच्या कृपादृष्टीसाठी शेंदूराचे अनेक उपाय केले जातात. तसेच हनुमान मंदिरात देवाला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा आहे. मंगळवार आणि शनिवारी हनुमानाला शेंदूर अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी हनुमानाला केशरी रंगाचा शेंदूर चमेलीच्या तेलात मिसळून लावला जातो. पण हनुमानाला शेंदूर अर्पण करण्यामागे एक रंजक कथा आहे. भगवान श्री राम यांच्या दीर्घायुष्याशी निगडित कथा जाणून घेऊया… ( Why does sindoor is offered to lord hanuman )
हनुमानाला शेंदूर चढवण्यामागे त्रेता युगातील एक अत्यंत भावनिक कथा प्रचलित आहे. पौराणिक कथेनुसार, वनवासातून परतल्यानंतर एके दिवशी हनुमानाने माता सीतेला आपल्या भांगात केशरी रंगाचे शेंदूर लावताना पाहिले. त्यावेळी हनुमानाने कुतूहलाने त्यांच्या जवळ जाऊन विचारले, ‘माता, तुम्ही तुमच्या भांगेत हे काय आणि का लावत आहात? याने काय होते?’
यावर माता सीतेने हनुमानाला सहज हसत उत्तर दिले, ‘हे शेंदूर आहे. हे लावल्याने माझे स्वामी प्रभू श्री राम यांचे आयुष्य वाढते आणि ते नेहमी सुखी राहतात.’ जेव्हा हनुमानाने सीतेचं हे उत्तर ऐकलं तेव्हा विचार केला की सीता मातेने चिमूटभर शेंदूर लावल्याने प्रभूंचं आयुष्य वाढत असेल तर मी माझ्या संपूर्ण शरीरालाच शेंदूर का लावू नये? यामुळे तर माझे प्रभू सदैव अमर आणि सुखी होतील.
याच विचाराने हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीराला केशरी शेंदूर लावून घेतला आणि ते प्रभू श्रीरामांकडे गेले. त्यांना या रूपात पाहून श्रीराम थक्क झाले. जेव्हा श्रीरामांनी हनुमानाला याचे कारण विचारले, तेव्हा हनुमानाने उत्तर दिले, ‘प्रभू, मातेने सांगितले की शेंदूर लावल्याने तुमचे आयुष्य वाढते, म्हणून मी माझ्या संपूर्ण शरीराला शेंदूर लावला आहे जेणेकरून तुम्ही सदैव अमर राहाल’.
हेही वाचा: Puja Tips : नैवेद्य अर्पण करताना घंटी का वाजवावी?
हनुमानाची ही निस्वार्थ भक्ती आणि प्रेम पाहून भगवान श्रीराम भावुक झाले. त्यांनी हनुमानाला मिठी मारली आणि वरदान दिले की, “जो भक्त तुला शेंदूर अर्पण करेल, त्यावर माझी विशेष कृपा राहील आणि त्याचे सर्व कष्ट दूर होती’. याच कारणामुळे हनुमानाला भक्तिभावाने शेंदूर अर्पण केला जातो. यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येते असं म्हणतात. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाचा रंग लाल/केशरी आहे. हनुमानाला शेंदूर अर्पण केल्याने मंगळ दोष आणि शनीच्या बाधेपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही.
Comments are closed.