New Year 2026 Health Resolution: नव्या वर्षी घ्या आरोग्याचा संकल्प; आहारात टाळा ‘हे’ पदार्थ; राहाल फिट अँड फाईन

अवघ्या काही दिवसांत आता सरत्या वर्षाला निरोप देत जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. नवीन वर्षात अनेक जण वेगवेगळे संकल्प करतात. पण यात सर्वात महत्त्वाचा ठरतो तो आरोग्य संकल्प. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देणं खूप कठीण झालं आहे. बाहेरचं खाणं, जेवणाच्या अनियमित वेळा, झोपेच्या अभावामुळे आरोग्य समस्या वाढल्या आहेत. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेण्यासह नियमित व्यायाम देखील गरजेचा असतो. मात्र दैनंदिन जीवनात नकळत अनेक पदार्थ आपण आहारात घेतो ज्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात. आता नवीन वर्षात आरोग्याचा संकल्प करून हे पदार्थ तुमच्या आहारातून काढून टाका आणि वर्षभर तुम्ही तंदुरुस्त राहा. ( New Year 2026 Health Resoulution Tips )

प्रक्रिया केलेले अन्न
आजकाल अनेक जण घाईगडबडीत आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ घेतात. पण ही सर्वात मोठी चूक ठरते. कारण इन्स्टंट नूडल्स, फ्रोजन फूड आणि सॉसेज यांसारख्या पदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्हज आणि सोडियमचे प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे उच्च रक्तदाब आणि किडनीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी नवीन वर्षात प्रक्रिया केलेले पदार्थ तुमच्या आहारात घेणं टाळा. शक्य तितक्या ताज्या आणि घरगुती पदार्थांना प्राधान्य द्या.

पॅकेज केलेला रस
फिटनेसकडे लक्ष देणारे अनेक जण सकाळी जिम, वर्कआऊट, व्यायाम झाल्यानंतर पॅकेज्ड ज्यूस पितात. पण हे पॅकेज्ड ज्यूस दीर्घकाळ ताजे राहण्यासाठी त्यात अनेक प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात. त्यामुळे नवीन वर्षात पॅकेज्ड ज्यूस घेणं टाळा. याउलट तुम्ही ताज्या फळांचा ज्यूस घ्या. यामुळे शरीराला मुबलक पोषक तत्वे मिळतात. तुम्ही लिंबूपाणी किंवा नारळ पाणी देखील घेतल्यास फायदा होतो.

मैद्याचे पदार्थ
ब्रेड, पास्ता, बिस्किटे आणि बाजारात उपलब्ध असलेल्या इतर उत्पादनांमध्ये रिफाइंड पीठ आणि प्रक्रिया केलेले धान्य असतं, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरतं. यामुळे पचनाच्या समस्या, रक्तातील साखर वेगाने वाढते. त्याऐवजी बाजरी, नाचणी, ज्वारीपासून बनवलेले पदार्थ घ्या. यामुळे पचनसंस्था सक्रिय आणि निरोगी राहते.

हेही वाचा: New Year Resolution Ideas : नवीन वर्ष, नवे संकल्प; नवीन वर्षात करा हे संकल्प

सॉस आणि डिप्स
बाजारात उपलब्ध असलेले बाटलीबंद सॉस आणि डिप्स एखाद्या पदार्थाची चव वाढवतात, पण ते आरोग्यासाठी खूप हानिकारक मानले जातात. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्याऐवजी घरी पुदिना आणि टोमॅटोची चटणी बनवून ठेवा. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.

ट्रान्स फॅट्स आणि तळलेले पदार्थ
बहुतेक लोक संध्याकाळी नाश्त्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले ट्रान्स फॅट्सयुक्त आणि तळलेले पदार्थ घेतात. हे पदार्थ शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतात, ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. त्याऐवजी काजू, बदाम, बिया आणि फुटाणे यांसारखे पदार्थ संध्याकाळी खाऊ शकता. तसेच भाजलेले किंवा एअर-फ्राईड पदार्थ खाल्ल्यास हरकत नाही.

Comments are closed.