Year Ender 2025: यंदाचं वर्ष ठरलं ‘वेडिंग इयर’; बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी बांधली लग्नगाठ

२०२५ हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी खऱ्या अर्थाने ‘लव्ह इयर’ ठरले आहे. कारण या वर्षी अनेक कलाकारांनी आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात केली. यंदा बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक जोडप्यांनी लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला. मोठ्या थाटामाटात या कलाकारांचा विवाहसोहळा पार पडला आहे. चला तर मग सरत्या वर्षानिमित्त जाणून घेऊया यावर्षी कलाविश्वातील कोणती जोडपी विवाहबंधनात अडकली..

समान्था रूथ प्रभू आणि राज निदिमोरु
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही कायमच चर्चेत असते मात्र या वर्षी ती चर्चेत राहिली ती तिच्या दुसऱ्या लग्नामुळे. १ डिसेंबर २०२५ रोजी तिने दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी अत्यंत साध्या आणि आध्यात्मिक पद्धतीने लग्न केले. ‘द फॅमिली मॅन’ च्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यापूर्वी सामंथाने अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केले होते पण २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

अरमान मलिक आणि आशना श्रॉफ
प्रसिद्ध गायक अरमान मलिक आणि इन्फ्लुएन्सर आशना श्रॉफ यांनी जानेवारी २०२५ मध्ये लग्नगाठ बांधली. अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०२३ मध्ये साखरपुडा केला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि अरमानने आशनासाठी गायलेले खास गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यामुळे या लग्नाची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली होती.

प्राजक्ता कोळी आणि वृषांक कनाल
‘मोस्टली सेन’ फेम युट्युबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीने तिचा प्रियकर वृषांक कनालशी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांनी मराठी आणि नेपाळी परंपरा जपत लग्नाचे विधी पूर्ण केले. तब्बल १३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हे दोघे विवाहबंधनात अडकले. प्राजक्ताचा पती वृषांक हा मूळचा नेपाळचा असून तो पेशाने वकील आहे.

हिना खान आणि रॉकी जैस्वाल
टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल हे दोघे ऑक्टोबर २०२५ विवाहबंधनात अडकले. अत्यंत खासगी पद्धतीने जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत निकाह आणि कोर्ट मॅरेज करून त्यांनी आयुष्याची नवी सुरुवात केली. हिनासाठी मधला काळ अत्यंत कठीण होता, कारण ती तिसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाशी लढत होती. या संपूर्ण प्रवासात रॉकी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. हिनाने ट्रीटमेंट यशस्वी झाल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.

सूरज चव्हाण आणि संजना गोफणे
‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आपली बालमैत्रीण संजना गोफणेसोबत लग्न केले. पुण्याच्या सासवडमध्ये पार पडलेल्या या लग्नाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली. सूरजने पारंपारिक सोहळ्यात संजनाशी लग्नाची गाठ बांधली. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा: Year Ender: कोणत्या सेलिब्रिटींसाठी 2025 वर्ष ठरलं यशाचं

प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडने २ डिसेंबर २०२५ रोजी शंभुराज खुटवड यांच्याशी लग्न केले. या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. कारण प्राजक्ताने तिच्या रिसेप्शनमध्ये नंदीवरून एन्ट्री घेतली होती, ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या दोघांचा लग्नसोहळा पुण्यात अगदी थाटामाटात पार पडला होता.

तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांचा विवाह सोहळा ४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील एका भव्य हॉटेलमध्ये पार पडला. राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते. तेजस्विनी आता माजी आमदार सदा सरवणकर यांची सून झाली आहे.

सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी
अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने अभिनेत्री पूजा बिरारीसोबत २ डिसेंबर २०२५ रोजी लग्न केले. लोणावळ्यात एका खाजगी रिसॉर्टवर पार पडलेल्या या सोहळ्यात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा: Year Ender: 2025 वर्ष मराठी माणसांसाठी ठरलं लकी, देशातले सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्रात

अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत
कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर व संगीतकार कुणाल भगत यांचा लग्नसोहळा १६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला आहे. अंकिताच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी उपस्थिती लावली होती. कोकणी पद्धतीने या दोघांनी लग्न केलं. या लग्नाची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती.

अक्षय केळकर आणि साधना
‘बिग बॉस मराठी ४’ चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर या वर्षी लग्नबंधनात अडकला आहे. ९ मे रोजी त्याने साधना काकतकरसोबत लग्नगाठ बांधली. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार अक्षयच्या लग्नाला पोहोचले होते. अक्षय आणि साधना हे दोघेही जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉसच्या घरात असताना अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख ‘रमा’ असा केला होता.

अक्षता आपटे आणि स्वानंद केतकर
झी मराठीवरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री अक्षता आपटे आणि अभिनेता स्वानंद केतकर यांनी ३० नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत ऑनस्क्रीन बहीण- भावाचं पात्र साकारून त्यांनी खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांना नवरा- बायको म्हणून स्वीकारलं आहे.

कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत
यंदा स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री कोमल कुंभार विवाहबंधनात अडकली. 25 नोव्हेंबर रोजी कोमलने गोकुळ दशवंतशी लग्नगाठ बांधली. या लग्न सोहळ्याला घरातील कुटुंब आणि मित्रमंडळींनी उपस्थिती लावली होती.

मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता मेघन जाधव व अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हे यंदा १६ नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांनीही आपल्या खास दिवसासाठी पारंपरिक आणि अत्यंत आकर्षक लूक निवडला होता. मेघन आणि अनुष्का यांनी स्टार प्रवाहावरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत एकत्र काम केलं आहे. तिथंच या दोघांची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मेघन व अनुष्का गेली अडीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

जय दुधाणे आणि हर्षला पाटील
बिग बॉस मराठी आणि स्प्लिट्सव्हिला या रिअॅलिटी शोस मधून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता जय दुधाणे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. 24 डिसेंबर रोजी जयचा शाही विवाह सोहळा पार पडला. जय आपल्या दीर्घकाळच्या प्रेयसी हर्षला पाटीलसोबत लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि लोकप्रिय युट्यूबर असलेली हर्षला पाटील आणि जय अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे
‘राजा रानीची गं जोडी’ फेम शिवानी सोनार आणि ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता अंबर गणपुळे हे सेलिब्रिटी जोडपे वर्षाच्या सुरुवातीला २१ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले.

हेही वाचा: Major Controversies 2025: देवाची नक्कल, जीवघेणा हल्ला ते मोडलेलं लग्न; कॉन्ट्रोवर्सीने हादरलं 2025 वर्ष

Comments are closed.