Cocktail VS Mocktail : पार्टीत ड्रिंक निवडताना गोंधळ होतोय? कॉकटेल आणि मॉकटेलमधील फरक जाणून घ्या

आजकाल कोणतीही पार्टी, लग्नसोहळा, वाढदिवस किंवा हॉटेलमधील कार्यक्रम असो, तिथे रंगीबेरंगी ड्रिंक्स हमखास पाहायला मिळतात. आकर्षक ग्लास, वेगवेगळे रंग आणि सजावट पाहून अनेकदा कॉकटेल आणि मॉकटेल यामध्ये फरक समजणं कठीण जाते. नावही जवळपास सारखे असल्यामुळे बरेच लोक गोंधळात पडतात. मात्र प्रत्यक्षात या दोन ड्रिंक्समध्ये मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. ड्रिंक घेण्यापूर्वी हा फरक समजून घेणे गरजेचे आहे. कॉकटेल आणि मॉकटेल दोन्हीही वेगवेगळ्या घटकांचे मिश्रण करून तयार केल्या जातात. दोन्ही दिसायला आकर्षक असतात आणि चवीला वेगळ्या असतात. पण त्यांची रचना, वापर आणि नियम पूर्णपणे वेगळे असतात. अनेकांना वाटते की फरक फक्त नावाचा आहे, पण तसे नाही. (difference between cocktail and mocktail in marathi)

कॉकटेल म्हणजे काय?
कॉकटेल ही अशी ड्रिंक आहे ज्यामध्ये अल्कोहोल असते. साध्या भाषेत सांगायचे झाले तर व्हिस्की, रम, वोडका, वाइन किंवा बिअर यांसारख्या अल्कोहोलिक पेयांमध्ये फळांचे रस, सोडा, टॉनिक वॉटर किंवा वेगवेगळे फ्लेवर मिसळून जी ड्रिंक तयार होते, तिला कॉकटेल म्हणतात. त्यामुळे कॉकटेल ही नेहमी अल्कोहोलयुक्त ड्रिंक असते. कॉकटेल हीअल्कोहोलिक ड्रिंक आहे. कॉकटेल बनवताना ठराविक पद्धत पाळली जाते. कोणते अल्कोहोल किती प्रमाणात वापरायचे, कोणते फ्लेवर घालायचे, हे आधीच निश्चित असते. चव आणि संतुलन राखणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे कॉकटेल मोजून आणि काळजीपूर्वक तयार केली जाते. अल्कोहोल असल्यामुळे कॉकटेलवर काही नियम लागू होतात. ठराविक वयापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कॉकटेल दिले जात नाही. तसेच काही ठिकाणी कॉकटेल सर्व्ह करण्यासाठी परवानगी असणे आवश्यक असते.

मॉकटेल म्हणजे काय?
मॉकटेल ही पूर्णपणे नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल वापरले जात नाही. फळांचे रस, सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, सिरप, लिंबू, पुदिना अशा घटकांपासून मॉकटेल तयार केले जाते. त्यामुळे ही ड्रिंक सर्व वयोगटांसाठी योग्य मानली जाते. मॉकटेल बनवताना फारसे कडक नियम नसतात. चव, रंग आणि सादरीकरण यावर जास्त भर दिला जातो. वेगवेगळे फ्लेवर एकत्र करून नवीन चवीचे प्रयोग करता येतात. त्यामुळे मॉकटेल हलकी, फ्रेश आणि पिण्यास चांगली असते. मॉकटेलमध्ये अल्कोहोल नसल्यामुळे लहान मुले, गरोदर महिला किंवा अल्कोहोल टाळणारे लोकही ती सहज घेऊ शकतात. म्हणूनच आजकाल अनेक कार्यक्रमांमध्ये मॉकटेलला जास्त पसंती दिली जाते.

नेमका फरक काय?
कॉकटेल आणि मॉकटेल दिसायला जरी सारखी वाटली तरी त्यामधील मुख्य फरक म्हणजे अल्कोहोल. कॉकटेलमध्ये अल्कोहोल असते आणि त्यावर नियम लागू होतात. मॉकटेलमध्ये अल्कोहोल नसते, त्यामुळे ती सर्वांसाठी सुरक्षित असते.

म्हणूनच कोणतीही ड्रिंक घेण्यापूर्वी ती कॉकटेल आहे की मॉकटेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या वय, आवड आणि गरजेनुसार योग्य पर्याय निवडल्यास पार्टीचा आनंद अधिक वाढतो.

Comments are closed.