मुलांसाठी व्हिलेज टूरही महत्वाची
पूर्वी मुलांना सुट्ट्या लागल्या की सगळ्यांना वेध लागायचे ते गावाचे . वर्षभरानंतर सुट्टीत गावी जायचं. आजी आजोबा, मामा- मामी, काका, काकू, आत्या आणि भावंडांना भेटायचं, नदीवर जायचं, गोठ्यातल्या गाई म्हशींना वासरू, रेडकूंबरोबर खेळायचं. शेतावर जायचं, विहीरीत डुंबायचं. आजीच्या हातची चुलीवरील गरमागरम जेवणाची चव चाखायची ही कल्पनाच कुटुंबाना जोडून ठेवायची. पण काळ बदलला . विभक्त कुटुंब पद्धतीने जोर धरला . नात्यांमधील संवेदना हरवल्या आणि मुलांचही गाव सुटलं. त्यामुळे आता मुलांना सुट्ट्या लागल्या किंवा विकेंडला कुटुंबांची पसंती रिसोर्ट,ऐतिहासिक स्थळांना असते. पण खरं तर नव्या पिढीची नाळ गावाबरोबर जोडण्याची हीच ती योग्य वेळ आहे हे पालकांनी ओळखायला हवं आणि मुलांना आपल्याच नाही तर इतर गावांची सैरही घडवायला हवी. त्यासाठी यामागे कारण काय आहे ते समजून घेऊया.
शहरात राहणाऱ्या मुलांना गावांबदद्ल , ग्रामीण संस्कृती, ग्रामीण व्यक्ती, त्यांचे राहणीमान, पेहराव ,तेथील खाद्यसंस्कृतीबद्दल फारशी माहीती नसते. पुस्तकातून मिळणाऱ्या आणि घरातील मोठ्यांकडून सांगण्यात येणाऱ्या माहीतीच्या आधारावर मुलं गावाचं चित्र रंगवतात. गाव म्हणजे मागास , लाईट नसलेलं , शहरी सोयीसुविधा नसलेलं, अशिक्षित लोकांच ठिकाण असाच ते विचार करतात. त्यामुळे गावात जाण्यास हल्लीची मुलं उत्सुक नसतात. यामुळे या मुलांना गाव. तेथील मोकळी हवा, निसर्ग , शेती, विहीरी, नद्या, तळी, ग्रामीण माणसं, खाद्यसंस्कृती, गावाचा विकास यांची ओळख करून देणं ही पालकांची जबाबदारी आहे. गावची साधी माणसं, साधं राहणीमान आणि शहरातली झगमगाट यातला फरक त्यामुळे मुलांना कळतो. बाहेरच्या जगात वावरताना त्यांना या अनुभवाचा फायदा होतो. गावं जंगल , वन्यजीव ,आणि मानव यांचा समतोल कसा राखतात हे गावात आल्यावरच नवीन पिढीला कळतं.
शहरातील सिमेंट क्रॉकिंटच्या जंगलात राहण्यापेक्षा, शेणाने सारवलेल्या, कौलाने नटलेल्या घरात चुलीवरचं जेवण खाल्याने आरोग्य कसं राखता येईल हे समजल्यामुळेच आज पर्यटकही महागड्या हॉटेलपेक्षा होमस्टे मध्ये राहण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. आज यातूनच ग्रामीण भागाकडे सेकंड होम थाटणाऱ्यांचा वर्गही वाढत आहे. यामुळे मुलांना झगमगाटात टोलेजंग इमारती आणि या शेणाने सारवलेल्या, कौलारू घरामध्ये राहण्यातील अंतरही समजेल. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद कसा मिळवता येतो हे ग्रामीण भागातील नागरिकांचे आयुष्य बघून मुलांना कळेल.
गावाकडे महिलांना पाणी आणण्यासाठी किती वणवण भटकावं लागते हे शहरातील मुलांना समजू लागते. त्यामुळे पाण्याचं महत्वही कळते. त्याचबरोबर कमी पैशात कमी खर्चातही उत्तम आयुष्य जगता येतं हे देखील नवीन पिढीला ग्रामीण भागातील नागरिकांचे लाईफस्टाईल बघून समजेल. यामुळे नवीन पिढीची जुन्या पिढीशी नव्याने नाळ जुळेल.
Comments are closed.