लहान वयातच तुमची मुलगा-मुलगी प्रेमात पडलेतं?

प्रेम म्हणजे प्रेम असतं , तुमचं आणि आमचं अगदी सेम असत…कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या या कवितेतील ओळी प्रत्येकाला प्रेमात पाडतात. कारण प्रेम ही भावनाच इतकी तीव्र आहे की ती तुम्हाला कळत नकळत आवडत्या माणसाच्या प्रेमात पाडतेच. वयानुसार या प्रेमाच्या व्याख्या आणि कारणही बदलतात. तेव्हा आपण त्या प्रेमाच कौतुक करतो.

पण जर हेच प्रेम कोवळ्या वयात म्हणजे अगदी ११ ते १५ वर्षात कोणावर जडलं तर मात्र हे त्या कोवळ्या वयातलं अल्लड प्रेम आहे हे समजून जावं. प्रामुख्याने जर तुमचा मुलगा किंवा मुलगी या वयात प्रेमात पडले तर आकांड तांडव करु नये. कारण हीच तर खरी तुमच्या पालकत्वाच्या कसोटीची वेळ आहे मुलांना समजून घेण्याची आणि समजवून सांगण्याची. आपल्यापैकी अनेक पालकांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो. मग शाळा कॉलेजात अभ्यास करण्याच्या वयात प्रेमात पडलेल्या या मुलांना कसं हाताळायचं ते तज्ज्ञांकडून समजून घेणं महत्वाचे.

नाजूक वय

तज्ज्ञांच्या मतानुसार १३ ते १८ हे वय नाजूक असतं. या वयातील मुलं मुली किशोरावस्थेतून जात असतात. यादरम्यान त्यांच्यात हार्मोन्समुळे अनेक शारिरीक, मानसिक बदल वेगाने होत असतात. यामुळेच आतापर्यंत एकत्र वाढलेल्या ,बागडलेल्या या मुलांना परस्परांबद्दल वेगळ्या भावना जाणवू लागतात. अचानक आपल्याच शाळेच्या ग्रुपमधली एखादी मुलगी किंवा मुलगा एकमेकांना आवडू लागतात. काहीवेळातर मुलांमध्ये मानसिक आकर्षणाबरोबरच शारिरीक आकर्षण निर्माण होतात.

त्यातच आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने ही मुलं मोबाईलवर समोरच्यापुढे आपल्या भावना व्यक्त करतात. तासन् तास त्याच्याशी त्याला आवडत्या विषयावर गप्पा मारू लागतात. पालकांचा सहवास टाळू लागतात. काहीवेळा पालकांना चकवा देऊन लपून छपून भेटूही लागतात.

आरोपानंतर आरोप

याबदद्ल पालकांना कळताच सामन्यपणे त्यांचा पारा चढतो. आपलं मूल कसं काय अस करु शकतं हा प्रश्न त्यांना सतावतो. तसेच समोरच्यानेच त्याला नादाला लावलं असावं असे आरोपप्रत्यारोप पालक एकमेकांच्या मुलांवर करतात.  कधी कधी मुल पालकांच्या रागाला घाबरून घरातून पळूनही जातात. यातून पुढे जाऊन अनेक अनर्थ घडू शकतात. हे सगळे टाळावयासाठी पालकांनी अशी प्रकरण स्मार्टपणे हाताळावी.

मुलांची बाजू ऐकावी

मुलाचे किंवा मुलीचे प्रेमप्रकरण आहे हे समजल्यानंतर पालक चिडतात. मुलांना मारतात, ओरडतात काहीजण मुलांना मारहाणही करतात. समोरच्या मुलाला किंवा मुलीला पुन्हा न भेटण्याची तंबी देतात. पण त्यामुळे मुलं अधिक बंडखोर होतात. कारण त्या परिस्थिती मुलांना पालक आपल्या विरोधात असल्याचे वाटते. रागात मुलं जीवाचे बरेवाईट करु शकतात. त्यामुळे मुला मुलीची बाजू आधी ऐकूण घ्यावी.

चूक बरोबर यातील फरक
मुलांना या वयातल्या नातेसंबंधासद्दल सांगाव. चित्रपटाचा हल्लीच्या मुलांवर अधिक प्रभाव असतो. त्यामुळे चित्रपटेतील कथेप्रमाणेच ते स्वताचे आयुष्यही बघतात. त्यांना सत्य परिस्थिती आणि चित्रपट यातील अंतर समजून सांगावे. प्रेम,आकर्षण,सेक्स, यातील फऱक समजून सांगावा.

Comments are closed.