Baby Massage Tips: थंडीत बाळाला कोणत्या तेलाने मालिश करावी? ते करताना ‘ही’ चूक टाळा
हिवाळ्यात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्वचेच्या समस्या होतात. या दिवसात त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातच लहान बाळांची त्वचा ही अधिकच संवेदनशील असते. त्यामुळे त्यांच्या त्वचेची निगा राखणे थोडे कठीण जाते. या दिवसात बाळाच्या त्वचेला मालिश करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच थंड वातावरण आणि कमी सूर्यप्रकाशामुळे मुलांना सर्दी आणि फ्लूचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत बाळाची मालिश करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.. ( Baby massage tips in winter )
जसे प्रौढांच्या त्वचेचे प्रकार वेगवेगळे असतात, तसेच बाळांची त्वचा देखील सारखी नसते. नवजात बाळांची त्वचा अत्यंत मऊ आणि संवेदनशील असते. म्हणूनच, बाळांसाठी खोबरेल तेल किंवा बदाम तेल सर्वोत्तम ठरते. कारण हे दोन्ही तेल त्वचेद्वारे लवकर शोषले जातात.
बाळ ६ महिन्यांपेक्षा जास्त वयाचे झाल्यावर तुम्ही मोहरीचे तेल देखील त्यांच्या मालिशसाठी वापरू शकता. मोहरीचे तेल शरीराला उबदार ठेवते. मात्र लक्षात ठेवा मोहरीचे तेल नेहमी थोडे कोमट करून वापरावे.
बहुतांश वेळा लोकं बाटलीतून तेल घेऊन थेट बाळाला मालिश करतात. पण थंड तेल हे बाळाच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. थंड तेल लावल्याने बाळाला सर्दी होऊ शकते. म्हणून बाळाला मालिश करण्यापूर्वी तेल थोडेसे गरम करणे अत्यंत महत्वाचे आहे. हातांना कोमट लागेल इतपतच तेल गरम करावे.
मालिश करण्याची योग्य वेळ कोणती?
बाळांना मालिश करण्यासाठी सकाळचा काळ हा सर्वोत्तम काळ मानला जातो, कारण या काळात त्यांचे शरीर अधिक ताजेतवाने आणि आरामदायी असते. सूर्योदय झाल्यानंतर बाळाला मालिश करण्याचे फायदे जास्त असतात. सूर्यप्रकाशामुळे शरीराला सौम्य उष्णता प्रदान होते, ज्यामुळे बाळाला सर्दी होण्याचा धोका कमी होतो.
सकाळी मालिश करण्याचे फायदे
- जर तुम्ही सकाळी बाळाला आंघोळ करण्यापूर्वी मालिश केली तर त्यांचे स्नायू मोकळे होतात. तेल मालिशमुळे रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे बाळाची वाढ होण्यास मदत होते.
- सकाळी मालिश करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे बाळाला चांगली झोप येते. जेव्हा शरीर आरामदायी असते तेव्हा बाळ शांत झोपते आणि उठल्यानंतर अधिक सक्रिय असते. त्यामुळेच बाळाला दिवसभर सक्रिय ठेवण्यासाठी सकाळी मालिशचा सल्ला दिला जातो.
हेही महत्त्वाचे:
- मालिश करताना बाळाची त्वचा उघडी असते ज्यामुळे थंडी वाजते. म्हणून मालिश केल्यानंतर लगेचच बाळाला उबदार कपडे घालणे खूप महत्वाचे आहे.
- तसेच मालिश केल्यानंतर लगेच बाळाला अंघोळ घालू नको. १० ते १५ मिनिटे थांबा जेणेकरून तेल खोलवर शोषले जाईल.
- योग्य तेल, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने मालिश केल्यास तुमच्या बाळासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे बाळाचे शरीर मजबूत होतेच आणि झोप, पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते. म्हणूनच हिवाळ्यात बाळांना दररोज मालिश करावी.
Comments are closed.