Makar Sankranti Sugad Puja Vidhi 2026: मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावी? जाणून घ्या
हिंदू धर्मात ‘मकर संक्रात’ हा महत्वाचा सण आहे. वर्षाचा पहिला सण मकर संक्रात असतो. हा सण सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. या दिवशी दानधर्म, स्नान आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सुगड पूजन केले जाते. ‘सुगड’ या शब्दाचा मुळ शब्द ‘सुघट’ हा आहे. ‘सुगड’ म्हणजे सुगडीत घट. या घड्यात शेतात बहरलेलं नवं धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. चला तर मग जाणून घेऊया सुगड पूजनाचा विधी.. ( Makar Sankranti 2026 Sugad Puja Vidhi )
सुगड पूजनासाठी लागणारे साहित्य
- ५ सुगड किंवा बोळकी दोन मोठी आणि तीन छोटी (किंवा पाच सारखी)
- हरभरा, गाजर, ऊसाचे पेरे, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगूळ, गव्हाच्या ओंब्या, मटार शेंगा, विड्याची पाने, सुपारी
- फुले, हळद, कुंकू, कापूस, डाळ आणि तांदूळ, पाट किंवा चौरंग, लाल वस्त्र, तांदूळ किंवा गहू
- समई (दिवा), तेल, वात, उदबत्ती, निरांजन, तूप, फुलवात, धूप, अक्षता, फुले, फुलांचा हार, अत्तर, गजरा,
सुगड पूजनाचा विधी
- पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र टाकावे. पाटाभोवती रांगोळी काढावी. विड्याची पाने, सुपारी पाटावर एका बाजूला ठेवा.
- सुगड मांडण्याआधी ओल्या हळदी, कुंकवाने रेषा काढाव्यात आणि नवीन पांढरा दोरा बांधावा.
- नंतर पाटावर खाली तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर सुगड मांडावे.
- यानंतर हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या लोंब्या असे सर्व साहित्य सुगडात घालावे.
- सुगडावर अक्षता, फुले, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा.
- यानंतर दिवा प्रज्वलित करून दिव्याचीही हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करावी.
- यानंतर धूप, अगरबत्ती लावून निरांजनात फुलवात ठेवून आरती तयार करून सुगडांना ओवाळा.
- शेवटी तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा.
- नंतर यातील एक सुगड देवघरात ठेवावे दुसरे तुळशीपाशी ठेवावे.
- त्यानंतर एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे. आणि उरलेले सुगड सवाष्णीला द्यावे.
अशाप्रकारे सुवासिनी महिला सुगड पूजन करतात.
हे पूजन म्हणजे मातीच्या भांड्यात हे धान्य ठेवून आपण पृथ्वीमातेचे आभार मानतो. ही पूजा शक्यतो संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी केली जाते. सुगड पुजल्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया एकमेकींना हे सुगड देतात. सुगड पुजण्यापासून पुढील १५ दिवस हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात तिळगुळासह वाण म्हणून एखादी वस्तू दिली जाते.
Comments are closed.