Aloevera Plant Care Tips: कोरफडीची वाढ खुंटल्यास काय करावे? जाणून घ्या प्रभावी उपाय

कोरफड ही सर्वात फायदेशीर वनस्पतींपैकी एक मानली जाते. कारण कोरफड त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. अनेकांच्या घरात कोरफडीचे रोप असते. मात्र कधीकधी काही कारणांमुळे त्याची वाढ खुंटते. त्याची अनेक कारणे असू शकतात. जर तुम्हालाही कोरफडीची वाढ खुंटल्यास काय करावे हा प्रश्न पडला असेल तर काही प्रभावी उपाय जाणून घेऊया… ( How to grow Aloe Vera Plant? )

कोरफडीच्या रोपाला जास्त पाण्याची गरज नसते.. त्यामुळे त्याला जास्त पाणी देणे टाळा. या रोपाला पाणी देण्यापूर्वी माती तपासा. जर माती कोरडी झाली असेल तरच त्याला पाणी द्या. तसेच ज्या कुंडीत रोप लावले आहे त्या कुंडीला छिद्र नसतील किंवा माती चिकट असेल, तर मुळे सडू लागतात आणि वाढ थांबते. कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली छिद्रे असावीत. हिवाळ्यात याला १५-२० दिवसांतून एकदा पाणी दिले तरी पुरेसे असते.

कोरफडीच्या रोपाला सूर्यप्रकाशाची गरज असते. जर तुम्ही कोरफड घरात ठेवली असेल, तर तिला खिडकीपाशी ठेवा जिथे किमान ३-४ तास चांगला प्रकाश मिळेल. सूर्यप्रकाश न मिळाल्यास या रोपाची वाढ खुंटते.

कोरफडीची लागवड नेहमी लहान किंवा मध्यम आकाराच्या कुंडीत करावी. खूप मोठ्या कुंडीत लावल्याने मुळे व्यवस्थित बसत नाहीत, ज्यामुळे झाडाची वाढ मंदावते. लहान कुंडीत मुळे मजबूत होण्यास मदत होते. म्हणून नेहमी लहान कुंडीत कोरफडीची लागवड करा.

कोरफडीला जास्त खताची गरज नसते, तरीही वाढीसाठी महिन्यातून एकदा गांडूळ खत किंवा शेणखत द्यावे. घरगुती उपाय म्हणून धुतलेल्या तांदळाचे पाणी किंवा कांद्याच्या सालीचे पाणीही थोड्या प्रमाणात दिल्यास त्याची वाढ चांगली होते.

Comments are closed.