Perfume Usage Tips : मानेवर परफ्युम लावणं का टाळावं? चुकीच्या वापरामुळे वाढू शकतो त्वचा आणि हार्मोनल त्रास
परफ्युम वापरणं आजच्या जीवनशैलीचा महत्वाचा भाग बनलं आहे. सुगंध टिकून राहावा, व्यक्तिमत्त्व उठून दिसावं यासाठी अनेकजण रोज परफ्युम लावतात. मात्र परफ्युम कोणत्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने वापरायचा, याकडे दुर्लक्ष केल्यास सौंदर्यापेक्षा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः थेट मानेवर किंवा घशाच्या आसपास परफ्युम स्प्रे करणं दीर्घकाळात त्रासदायक ठरू शकतं.
मानेवरील त्वचा ही शरीरातील अतिशय नाजूक आणि संवेदनशील भागांपैकी एक आहे. ही त्वचा पातळ असून या भागातून रसायनं शरीरात वेगानं शोषली जातात. त्यामुळे परफ्युममधील केमिकल्स थेट रक्तप्रवाहात जाण्याची शक्यता वाढते. अनेकांना याची जाणीव नसते, पण रोज मानेवर परफ्युम लावण्याची सवय हळूहळू आरोग्यावर परिणाम करू शकते.
मानेखाली थायरॉईड ग्रंथी असतात. या ग्रंथी शरीराच्या अनेक महत्त्वाच्या क्रियांवर नियंत्रण ठेवतात. वजन, ऊर्जा पातळी, मनःस्थिती, हृदयाचे ठोके, मासिक पाळी, प्रजनन क्षमता आणि एकूण हार्मोनल संतुलन या सर्वांशी थायरॉईडचा थेट संबंध असतो. या भागात सातत्यानं केमिकलयुक्त परफ्युम वापरल्यास थायरॉईडच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक परफ्युममध्ये ‘एंडोक्राइन डिसरप्टर्स’ (EDCs)) म्हणून ओळखली जाणारी रसायनं असतात. ही रसायनं शरीरातील हार्मोनल सिस्टीममध्ये अडथळा निर्माण करू शकतात. दररोज मानेवर परफ्युम स्प्रे केल्यास ही द्रव्यं शरीरात हळूहळू साठू शकतात. याचा परिणाम कालांतरानं थायरॉईड डिस्फंक्शन, वजन अचानक वाढणं किंवा कमी होणं, सतत थकवा जाणवणं आणि हार्मोनल असंतुलन अशा स्वरूपात दिसू शकतं.
काही प्रकरणांमध्ये प्रजननाशी संबंधित अडचणीही उद्भवू शकतात. विशेषतः गर्भधारणेत अडथळे, मासिक पाळीतील अनियमितता किंवा मूड स्विंग्ससारखे त्रास जाणवू शकतात. त्यामुळे परफ्युमचा वापर करताना केवळ सुगंधाकडे न पाहता आरोग्याचाही विचार करणं गरजेचं आहे.
तज्ज्ञांचा सल्ला
तज्ज्ञांच्या मते, परफ्युम लावायचं असल्यास थेट त्वचेवर, विशेषतः मान किंवा घसा या भागावर स्प्रे करणं टाळावं. त्याऐवजी कपड्यांवर हलकासा स्प्रे करणं अधिक सुरक्षित मानलं जातं. तसेच जास्त प्रमाणात परफ्युम वापरण्याऐवजी मर्यादित वापर करणं शरीरासाठी फायद्याचं ठरू शकतं.
Comments are closed.