Warm Water Benefits : वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी खरंच उपयोगी ठरतं का? जाणून घ्या सविस्तर
वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. कधी डाएट, कधी व्यायाम, तर कधी घरगुती उपाय. त्यातच कोमट पाणी पिणं हा एक सोपा आणि स्वस्त उपाय म्हणून अनेक जण अवलंबतात. पण खरंच कोमट पाणी वजन कमी करण्यात मदत करतं का, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. यामागचं वास्तव काय आहे, ते सोप्या भाषेत जाणून घेऊया. (warm water for weight loss benefits)
कोमट पाणी म्हणजे फार गरम नाही आणि फार थंडही नाही, शरीराला सहज स्विकारता येईल असं पाणी. आयुर्वेदात कोमट पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी कोमट पाणी प्यायल्यास शरीरावर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.
कोमट पाणी वजन कमी करण्यास कसं मदत करतं?
कोमट पाणी प्यायल्यावर शरीराचं अंतर्गत तापमान थोडंसं वाढतं. ते पुन्हा संतुलित करण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा वापरावी लागते. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम सक्रिय होतो. मेटाबॉलिजम चांगला असेल तर शरीरातील कॅलरीज जळण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
कोमट पाणी शरीरातील घाण बाहेर काढण्यासही उपयोगी ठरतं. घाम आणि लघवीच्या माध्यमातून विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे पचनसंस्था सुधारते. पचन नीट झालं की अन्नातून मिळणारी चरबी शरीरात साठण्याऐवजी ऊर्जा म्हणून वापरली जाते.
जेवणानंतर थोड्या वेळाने कोमट पाणी प्यायल्यास अन्न पचायला मदत होते. विशेषतः तेलकट आणि जड अन्न पचवण्यासाठी कोमट पाणी उपयुक्त ठरतं. त्यामुळे पोटावरची अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होण्यास मदत होते.
कोमट पाणी कधी आणि कसं प्यावं?
सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे आतडी सक्रिय होतात आणि पोट साफ होण्यास मदत होते. काही लोक या पाण्यात लिंबाचा रस किंवा थोडंसं मध मिसळतात, पण ते प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार योग्य आहे का हे पाहणं महत्वाचं असतं.
जेवणाआधी साधारण अर्धा तास कोमट पाणी प्यायल्यास भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त जेवण होण्याची शक्यता कमी होते. मात्र जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं. साधारण 30 ते 45 मिनिटांनंतर कोमट पाणी घेतल्यास पचनक्रिया सुधारते.
कोमट पाणी पिताना काय काळजी घ्यावी?
पाणी खूप गरम असू नये. फार गरम पाण्यामुळे तोंड, घसा किंवा अन्ननलिकेला इजा होऊ शकते. कोमट पाणी नेहमी हळूहळू, घोटाघोट पिणं योग्य ठरतं. एकदम जास्त पाणी पिणं टाळावं.
हे लक्षात ठेवणंही महत्त्वाचं आहे की, फक्त कोमट पाणी पिऊन वजन कमी होत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य दिनचर्या यासोबत कोमट पाणी पिलं तर त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो.
कोमट पाण्याचे इतर फायदे
कोमट पाणी पिल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते. शरीर आतून स्वच्छ झाल्यामुळे त्वचेवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो आणि मुरुमांची समस्या कमी होऊ शकते. तसेच घसा दुखणं, कफ साचणं अशा तक्रारींमध्येही कोमट पाणी दिलासा देऊ शकतं. एकूणच, कोमट पाणी हे वजन कमी करण्यासाठी थेट उपाय नसला, तरी योग्य सवयींसोबत वापरल्यास ते नक्कीच मदत करू शकतं.
Comments are closed.