Edible Candle : खाण्याचा नवा ट्रेंड! पेटवून सर्व्ह केली जाणारी ‘एडिबल कँडल’ नेमकी आहे तरी काय?
आजकाल खाणं म्हणजे केवळ पोट भरणं राहिलेलं नाही. लोकांना चवीसोबत अनुभवही तितकाच खास हवा असतो. त्यामुळेच फूड इंडस्ट्रीमध्ये सतत नवनवीन कल्पना पुढे येताना दिसतात. याच ट्रेंडमध्ये सध्या सोशल मीडियावर आणि कॅफे-रेस्टॉरंट्समध्ये एक वेगळीच गोष्ट चर्चेत आहे, ती म्हणजे ‘एडिबल कँडल’. (what is edible candle food trend)
वाचून थोडं आश्चर्य वाटेल, कारण ही कँडल पेटवली जाते आणि नंतर खाल्लीही जाते. दिसायला अगदी मेणबत्तीसारखी असलेली ही एडिबल कँडल प्रत्यक्षात फ्लेवर केलेल्या बटरपासून तयार केलेली असते. जेवणाच्या टेबलावर ठेवलेली ही कँडल पेटवल्यावर हळूहळू वितळते आणि त्यातून गरम, सुगंधी बटर बाहेर येतं. हे वितळलेलं बटर ब्रेड, बन किंवा टोस्टसोबत खाल्लं जातं.
आज अनेक कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये ब्रेड सर्व्ह करण्याची ही पद्धत लोकप्रिय होत आहे. डिनर डेट, खास पार्टी किंवा होम डिनर सेटअपमध्ये एडिबल कँडलमुळे जेवणाचा अनुभव अधिक खास ठरतो. पाहायला वेगळी, चवीला खास आणि सादरीकरणात आकर्षक असल्यामुळे ही संकल्पना झपाट्याने व्हायरल होत आहे.
एडिबल कँडल म्हणजे नेमकं काय?
एडिबल कँडल म्हणजे बटर, लसूण आणि मसाल्यांनी तयार केलेलं मिश्रण, जे कँडलच्या आकारात घट्ट केलं जातं. यामध्ये मधोमध फूड-ग्रेड वात बसवलेली असते. पेटवल्यावर हे बटर हळूहळू वितळतं आणि गरम सॉससारखं वापरता येतं. विशेषतः ब्रेडसोबत हे बटर खाण्याची मजा वेगळीच असते.
घरीही बनवता येते एडिबल कँडल
ही संकल्पना जितकी आकर्षक वाटते, तितकीच ती घरी बनवायला सोपी आहे. यासाठी फार वेगळ्या किंवा महागड्या साहित्याची गरज नसते. साधं अनसॉल्टेड बटर, लसूण, थोडंसं मीठ आणि हर्ब्स वापरून एडिबल कँडल तयार करता येते. योग्य मोल्डमध्ये हे मिश्रण ओतून घट्ट केल्यावर तुमची कँडल तयार होते.
सर्व्ह करताना काय काळजी घ्यावी?
एडिबल कँडल नेहमी उष्णतेला झेलू शकणाऱ्या प्लेटमध्येच ठेवा. खाण्याच्या अगदी आधीच ती पेटवा आणि जास्त वेळ जळू देऊ नका. वापरलेली वात फूड-ग्रेड असणं महत्त्वाचं आहे. स्वच्छता आणि सुरक्षितता पाळली तर ही कँडल जेवणाचा आनंद नक्कीच वाढवते.
चवीसोबत अनुभव देणारी ही एडिबल कँडल सध्या फूड लव्हर्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल, तर हा फूड ट्रेंड नक्कीच खास अनुभव देणारा ठरेल.
Comments are closed.