Cooking Oil Monthly Limit : घरात महिन्याला किती तेल वापरावं ? इथे चुकाल तर आरोग्याला मुकाल, वाचा तज्ञांचा सल्ला
भारतीय घरांमध्ये स्वयंपाक म्हणजे केवळ पोट भरणं नाही, तर चव, सवय आणि परंपरेचा भाग असतो. फोडणीचा खमंग सुगंध, रस्सेदार भाजी, कुरकुरीत भजी पाहिल्यावर तेल थोडं जास्तच पडतं. अनेकदा चव चांगली यावी म्हणून आपण नकळत जास्त तेल वापरतो. पण हीच सवय हळूहळू आरोग्यासाठी घातक ठरू शकते. (monthly cooking oil consumption per person)
तेल अन्नाला चव देतं, ऊर्जा देतं, पण प्रमाणाबाहेर गेलं की ते शरीरासाठी घातक बनतं. रोजच्या आहारातून जास्त तेल पोटात गेलं, तर त्याचा थेट परिणाम वजन, हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होतो. त्यामुळे ‘किती तेल वापरायचं’ हे प्रत्येक घरानं गांभीर्यानं समजून घेणं गरजेचं आहे.
तेल जास्त खाल्लं तर काय होतं?
अतिरिक्त तेलामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं. हे कोलेस्ट्रॉल हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये साठू लागतं आणि रक्तप्रवाह अडथळलेला होतो. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या समस्यांमध्येही तेलाचा अतिरेक कारणीभूत ठरतो. विशेषतः बैठ्या कामाचं आयुष्य असलेल्यांसाठी ही बाब अधिक धोकादायक ठरू शकते.
एका व्यक्तीसाठी महिन्याचं योग्य तेलाचं प्रमाण
आहारतज्ज्ञांच्या आणि डॉकटरांच्या सल्ल्यानुसार सामान्य आणि निरोगी व्यक्तीसाठी संपूर्ण महिन्यात साधारण 500 मिली म्हणजे अर्धा लिटर तेल पुरेसं असतं. याचा अर्थ दिवसाला अंदाजे 2 ते 3 चमचे तेल इतकंच प्रमाण योग्य मानलं जातं. यापेक्षा जास्त तेल नियमित घेतलं गेलं, तर शरीरावर त्याचा ताण अधिक वाढतो.
चार जणांच्या कुटुंबासाठी किती तेल योग्य?
घरात चार सदस्य असतील, तर महिन्याला साधारण 2 लिटर तेल पुरेसं ठरतं. अनेक घरांमध्ये मात्र 5 ते 8 लिटर तेल सहज वापरलं जातं, जे आरोग्यासाठी धोक्याचं संकेत आहे. महिन्याचं तेल मोजून वापरण्याची सवय लावली, तर भविष्यातील अनेक आजार टाळता येऊ शकतात.
तेलाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी?
तळलेले पदार्थ रोजच्या आहारात असणं टाळायला हवं. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जेवणात तेलाचं प्रमाण विशेषतः कमी असावं. सूर्यफूल, शेंगदाणा, तीळ तेल किंवा तूप काहीही वापरलं तरी “प्रमाण” हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणतंही तेल जास्त प्रमाणात घेतल्यास फायदे नाहीसे होतात आणि नुकसान सुरू होतं.
कमी तेलात स्वयंपाक करण्याच्या सोप्या सवयी
आजकाल नॉन-स्टिक भांडी वापरल्यास कमी तेलातही चांगला स्वयंपाक करता येतो. तळण्याऐवजी उकडलेले किंवा वाफवलेले पदार्थ खाण्याची सवय लावणं फायद्याचं ठरतं. फोडणी देताना थेट डब्यातून तेल न ओतता चमच्याने मोजून वापरल्यास तेलावर आपोआप नियंत्रण राहतं. तसेच तेल चांगलं तापल्यानंतरच फोडणी दिली, तर पदार्थ कमी तेल शोषतात.
Comments are closed.