Baby Planning : फॅमिली प्लॅनिंगसाठी योग्य वय कोणतं? लोकांचं नाही, ‘या’ गोष्टींचं ऐका, वाचा एक्स्पर्टसचा सल्ला
लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच किंवा दोन-तीन वर्षांत ‘आता गुड न्यूज कधी?’ असा प्रश्न अनेक जोडप्यांना विचारला जातो. कधी नातेवाईक, कधी मित्रमंडळी तर कधी समाजाकडून सतत सल्ले मिळत राहतात. पण बाळ जन्माला घालणं म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी स्वीकारणं असतं. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंगचा निर्णय घाईघाईत न घेता विचारपूर्वक घेणं अत्यंत गरजेचं आहे. (best time for baby planning tips)
बाळ येणं म्हणजे आनंदासोबतच मोठा बदल. दैनंदिन आयुष्य, करिअर, खर्च, मानसिक स्थिती आणि नातेसंबंध सगळ्यावरच त्याचा परिणाम होतो. म्हणूनच ‘योग्य वेळ’ कोणती, हे ठरवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे.
1. वय आणि शरीराची तयारी
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर महिलांसाठी वयाची 20 ते 30 वर्षं ही प्रजनन क्षमतेसाठी चांगली मानली जातात. 30 नंतर हळूहळू शरीरातील बदल सुरू होतात आणि 35 नंतर गर्भधारणेतील अडचणी वाढू शकतात. पुरुषांमध्येही वयानुसार शुक्राणूंच्या गुणवत्तेत बदल होऊ शकतो. त्यामुळे दोघांचंही शारीरिक आरोग्य संतुलित आहे का, हे पाहणं महत्वाचं ठरतं.
2. मानसिक तयारी आहे का?
बाळ आल्यावर आयुष्य पूर्णपणे बदलतं. झोपेची वेळ, स्वतःसाठीचा वेळ, अचानक वाढणाऱ्या जबाबदाऱ्या यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहात का, हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारा. सध्या आयुष्यात सतत तणाव, कामाचा दबाव किंवा नात्यात अस्थिरता असेल, तर त्या परिस्थितीत बाळाचा निर्णय अधिक कठीण ठरू शकतो.
3. आर्थिक स्थिरता
आजच्या काळात बाळाचा खर्च फक्त बाळंतपणापुरता मर्यादित नसतो. त्यानंतरचे आरोग्य, लसीकरण, संगोपन आणि शिक्षण या सगळ्याचा विचार करावा लागतो. आईला काही काळ कामातून ब्रेक घ्यावा लागल्यास घरखर्च कसा चालेल, बचत आहे का, हे मुद्दे आधीच स्पष्ट असणं गरजेचं आहे. आर्थिक स्थैर्य असल्यास पालकत्वाचा ताण कमी होतो.
4. करिअर आणि मदतीची व्यवस्था
विशेषतः महिलांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. करिअरच्या टप्प्यावर बाळ झाल्यास ऑफिसमधील सुट्ट्या, कामावर परतण्याची सोय आणि सहकार्य याची माहिती आधीच असणं गरजेचं आहे. तसेच बाळ झाल्यानंतर घरात मदतीला कोणी असेल का, की सगळं दोघांनाच सांभाळावं लागेल, यावरही चर्चा करणं आवश्यक आहे.
5. नात्यातील समजूतदारपणा
बाळ येण्याआधी जोडीदारामधील संवाद, एकमेकांवरील विश्वास आणि समज महत्त्वाची असते. आधीच नात्यात तणाव असेल, तर बाळामुळे जबाबदाऱ्या वाढून मतभेद अधिक वाढू शकतात. मजबूत आणि समजूतदार नातं असेल, तर पालकत्वाचा प्रवास अधिक सोपा आणि आनंददायी ठरतो.
तज्ज्ञांच्या मते, आजच्या काळात पर्याय उपलब्ध आहेत, पण नैसर्गिक दृष्टिकोनातून विचार केला तर तिशीच्या आत किंवा तिशीच्या सुरुवातीला फॅमिली प्लॅनिंग करणं आई आणि बाळ दोघांसाठीही सुरक्षित मानलं जातं. मात्र, इतरांचं ऐकून किंवा समाजाच्या दबावाखाली निर्णय घेणं टाळावं.
जेव्हा तुम्ही शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या तयार असाल, तेव्हाच ती तुमच्यासाठी योग्य वेळ असते. फॅमिली प्लॅनिंग हा वैयक्तिक निर्णय आहे आणि तो तुमच्या आयुष्याच्या परिस्थितीनुसारच घेतला गेला पाहिजे.
Comments are closed.