Does rice make you sleepy : तुम्हालाही भात खाल्ल्यावर झोप येते? जाणून घ्या खरं कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत
दुपारच्या जेवणानंतर अनेकांना भात खाल्ल्यावर झोप येते किंवा शरीर थकलेल्यासारखं वाटतं. ऑफिसमध्ये काम करताना डोळे मिटायला लागतात, अभ्यास करताना लक्ष लागत नाही. ही समस्या अनेक घरांमध्ये ऐकायला मिळते. पण भात खाल्ल्यामुळे असं का होतं, हे अनेकांना माहीत नसतं. भात हा आपल्या रोजच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग असला तरी तो कसा आणि किती प्रमाणात खाल्ला जातो, यावर त्याचा शरीरावर होणारा परिणाम ठरतो. भात खाल्ल्यानंतर येणाऱ्या झोपेला वैद्यकीय भाषेत ‘फूड कोमा’ असं म्हणतात. यामागे शरीरातील काही नैसर्गिक प्रक्रिया कारणीभूत असतात.
भातामुळे झोप का येते?
पांढरा भात हा पटकन पचणारा पदार्थ आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण भात खातो, तेव्हा तो लवकर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतो. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते. साखरेचा तोल सांभाळण्यासाठी शरीर मोठ्या प्रमाणात इन्सुलिन तयार करतं. याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.
इन्सुलिनमुळे काही अमिनो अॅसिड्स स्नायूंमध्ये जातात, पण ट्रिप्टोफान नावाचं एक घटक रक्तात जास्त काळ राहतो. हा ट्रिप्टोफान मेंदूपर्यंत पोहोचतो आणि तिथे सेरोटोनिन व मेलाटोनिन हे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स शरीराला शांतता देतात आणि झोप येण्याची भावना निर्माण करता.
याशिवाय, जेवणानंतर पचनासाठी शरीराचं जास्त रक्त पोटाकडे वळतं. त्यामुळे मेंदू आणि स्नायूंना मिळणारी ऊर्जा कमी होते. यामुळे सुस्ती, थकवा आणि झोप येणं स्वाभाविक ठरतं.
इतर कारणे कोणती?
भात जास्त प्रमाणात खाल्ला तर ही समस्या अधिक वाढते. जेवणात फक्त भात आणि फारसं प्रोटीन किंवा भाज्या नसतील, तर झोप लवकर येते. दुपारच्या वेळी शरीराची नैसर्गिक लयही थोडी मंदावलेली असते. त्यामुळे भाताचा परिणाम त्या वेळेस अधिक जाणवतो.
भात खाण्याचे काही फायदेही आहेत
भात पूर्णपणे वाईट आहे असं म्हणता येणार नाही. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात भात खाल्ल्यास शरीराला आराम मिळतो. काही लोकांना रात्री भात खाल्ल्यानंतर झोप चांगली लागते. मन शांत होतं आणि तणाव कमी झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणात थोड्या प्रमाणात भात घेतल्यास काहींना फायदा होऊ शकतो.
अति भात खाण्याचे तोटे
दिवसा सतत सुस्ती येत असल्यास कामावर परिणाम होतो. एकाग्रता कमी होते. रक्तातील साखर पटकन वाढून नंतर झपाट्याने कमी होते, त्यामुळे पुन्हा भूक लागते आणि चिडचिड वाढते. रोज जास्त प्रमाणात पांढरा भात खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. कमी हालचाल आणि जास्त भात यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. फक्त भातावर आधारित जेवण असल्यास शरीराला आवश्यक प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वे कमी पडतात.
भात योग्य पद्धतीने कसा खावा?
भात खाल्ल्यावर झोप येऊ नये, यासाठी प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. एका वेळेस छोटी वाटी किंवा मर्यादित प्रमाणात भात पुरेसा असतो. थाळीत अर्धा भाग भाज्या आणि कोशिंबीर असावा. एक चतुर्थांश भागात डाळ, कडधान्य, पनीर, अंडी किंवा मासे यासारखं प्रोटीन असावं आणि उरलेल्या भागात भात किंवा इतर कार्बोहायड्रेट्स असावेत.
पांढऱ्या भाताऐवजी ब्राउन राइस किंवा लाल तांदूळ घेतल्यास फायबर जास्त मिळतं आणि रक्तातील साखर हळूहळू वाढते. भात शिजवून थोडा वेळ थंड करून पुन्हा गरम करून खाल्ल्यास तो शरीरावर हलका पडतो. दुपारच्या जेवणानंतर थोडं चालणं, ताक किंवा पाणी पिणंही उपयुक्त ठरतं. जेवणानंतर लगेच गोड पदार्थ आणि जास्त तेलकट पदार्थ टाळावेत.
भात खाल्ल्यानंतर झोप येणं ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. ती पूर्णपणे चुकीची नाही. पण जर रोजच खूप जास्त सुस्ती जाणवत असेल, तर खाण्याच्या सवयी तपासणं गरजेचं आहे. संतुलित आहार, योग्य प्रमाण आणि थोडी हालचाल ठेवली तर भातही आरोग्यासाठी योग्य ठरू शकतो.
Comments are closed.