तामिळनाडूमध्ये 97 लाख मतदारांना वगळण्यात आले आहे.
‘एसआयआर’ अस्थायी मतदारसूची झाली प्रसिद्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तामिळनाडू राज्याची अस्थायी सुधारित मतदारसूची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या राज्यात 97 लाखांहून अधिक मतदार वगळण्यात आले आहेत. अशा प्रकारे या राज्यात ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षणा’चा (एसआयआर) प्रथम टप्पा पूर्ण झाला आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील 14 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
अवैध मतदारांची नावे वगळल्यानंतर आता या राज्यात एकंदर 5 कोटी 43 लाख 76 हजार 755 मतदार राहिलेले आहेत. त्यांच्यापैकी साधारणत: 2 कोटी 66 लाख महिला मतदार, तर 2 कोटी 77 लाख पुरुष मतदार या सूचीत आहेत. ‘एसआयआर’ होण्यापूर्वी या राज्यात मतदारांची संख्या 6.41 कोटी होती.
शुक्रवारी सूची प्रसिद्ध
तामिळनाडूची अस्थायी मतदारसूची शुक्रवारी राज्याच्या निवडणूक अधिकारी अर्चना पटनाईक यांनी प्रसिद्ध केली. कोणत्या कारणांसाठी किती नावे वगळण्यात आली आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. 26.94 लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे. तर 66.66 लाख मतदारांचे स्थायी स्थलांतर झाले आहे. 3 लाख 39 हजार 278 डुप्लिकेट मतदार वगळण्यात आले आहेत. जे मतदार स्थलांतरित आहेत, त्यांच्या घरी 3 वेळा जाऊनही ते न भेटल्याने त्यांना स्थायी स्थलांतरित मानण्यात आले आहे, अशी माहितीही अर्चना पटनाईक यांनी यावेळी दिली.
राज्य सरकारचा विरोध
राज्य सरकारने या ‘एसआयआर’ला कडाडून विरोध केला होता. राज्य सरकारने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही सादर केली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती देण्यात नकार दिला होता. त्यामुळे या प्रक्रियेचा प्रथम टप्पा तामिळनाडूत सुरळीतपणे पार पडला आहे. ज्यांची नावे वगळली आहेत, ते नावे समाविष्ट करण्यासाठी आयोगाकडे अर्ज सादर करु शकतात. ही प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यातील आहे. त्यानंतर अंतिम मतदारसूची प्रसिद्ध केली जाणार आहे.
चेन्नईत 14 लाख नावे रद्द
तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे साधारणत: 14 लाख नावे मतदारसूचीतून वगळण्यात आली आहेत. राज्याच्या अन्य कोणत्याही जिल्ह्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आलेली नाही. राजधानी चेन्नईतून स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. आता या अस्थायी सूचीवर राजकीय पक्ष कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्याकडे उत्सुकतेने पाहिजे जाऊ लागले आहे.
शुक्रवारपासूनच आक्षेपांनाही अनुमती
19 डिसेंबर 2025 पासून 18 जानेवारी 2026 पर्यंत मतदार या अस्थायी सूचीवर आक्षेप नेंदवू शकतात. ज्यांची नावे वगळली आहेत, असे मतदार त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठीही अर्ज करु शकतात. अशा अर्जांची छाननी करुन अर्ज योग्य असल्यास निवडणूक आयोग त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करु शकतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आयोगाकडून सूचीची छाननी होणार असून नंतर फेब्रुवारीत अंतिम मतदारसूची प्रसिद्ध केली जाणार आहे.
एप्रिल-मे मध्ये निवडणूक
तामिळनाडूत आगामी एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या आधी किमान एक महिना, निवडणूक आयोगाला अंतिम मतदारसूची प्रसिद्ध करावी लागणार आहे. अंतिम मतदारसूची प्रसिद्ध केल्यानंतर त्याच सूचीच्या आधारे विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. ज्या मतदारांना प्रथमच नावे नोंदवायची आहेत, असे मतदारही अर्ज करु शकणार आहेत. मतदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आपल्या नावाची पडताळणी करावी आणि ते नसेल तर आयोगाकडे अर्ज करावा, असे आवाहन गेले गेले.
Comments are closed.