Summer Yoga: उन्हाळ्यात थकवा दूर करण्यासाठी करा ‘ही’ योगासने
उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ३५ च्या पुढे गेला आहे. त्यामुळे उष्णतेवर मात करण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, योग्य आहार, झोप घेणे महत्त्वाचे आहे. मात्र हे सर्व करूनही अनेकदा उन्हाळ्यात थकल्यासारखं वाटते. खरे तर वाढत्या तापमानामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि सतत थकवा जाणवतो. हा थकवा दूर करून शरीर सक्रिय ठेवण्यासाठी काही योगासने फायदेशीर ठरतात. ( Summer Yoga Poses )
शितली प्राणायाम
शीतली प्राणायाम शरीराला थंडावा देण्यासाठी केला जातो. या प्रकारात तोंडावाटे हवा आत घेऊन नाकावाटे सोडली जाते. ताप, पित्तविकार तसेच चिडचिड कमी करण्यासाठी प्राणायामाचा हा प्रकार महत्त्वाचा आहे. नियमितपणे केल्यास उच्च रक्तदाबही नियंत्रित होतो.
वृक्षासन

एकाग्रता वाढवण्यासाठी आणि शरीराचा समतोल राखण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. यासाठी ताठ उभे राहा. उजवा पाय दुमडून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. दोन्ही हात जोडून डोक्याच्या वर नेऊन नमस्कार करा.
बद्ध कोणासन

दिवसभराच्या धावपळीनंतर येणारा थकवा घालवण्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे. जमिनीवर बसून दोन्ही पाय दुमडा. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत जवळ आणा. हाताने पायाची पावले पकडा आणि दोन्ही गुडघे वर-खाली हलवा.
शवासन

सर्व योगासने केल्यावर हे आसन केले जाते. यामध्ये पाठीवर डोळे बंद करून झोपून श्वासावर लक्ष केंद्रित केले जाते. या आसनामुळे शारीरिक, मानसिक थकवा, ताण कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, निद्रानाश यांवरही हे उपुयक्त आहे.
Comments are closed.