Ram Navami 2026: राम नवमीला अशी करा प्रभू श्री रामांची उपासना

राम नवमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांना समर्पित हा सण आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्री राम यांचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे. त्यामुळे या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीच्या दिवशी उपवास करणे आणि श्री रामाची कथा ऐकल्याने श्री रामांचे आपल्याला आशिर्वाद प्राप्त होतात असे म्हणतात. यंदा रामनवमी कधी आहे? शुभमुहूर्त आणि या दिवशी प्रभू श्री रामांची उपासना कशी करावी? जाणून घेऊया.. ( Ram Navami 2026 Date, Tithi,  Shubh Muhurat And Puja Vidhi )

राम नवमी तिथी
पंचांगानुसार, यंदा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीची सुरुवात २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांपासून होणार आहे. तर २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजून ०६ मिनिटांनी ही तिथी संपणार आहे. त्यामुळे स्मार्त परंपरेनुसार, यंदा राम नवमी ही गुरुवार, २६ मार्च रोजी साजरी केली जाईल. तर उदयतिथीचे पालन करणारे वैष्णव भक्त २७ मार्च २०२६ रोजी भगवान राम यांची जयंती साजरी करतील.

शुभ वेळ
नवमी तिथीला गुरुवार, २६ मार्च रोजी सकाळी ११:१३ ते दुपारी ०१:४१ पर्यंत शुभ मुहूर्त असेल. तर या दिवशी दुपारी १२:०२ ते १२:५१ पर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे. राम नवमीचा मध्यान्ह क्षण हा दुपारी १२:२७ वाजता असणार आहे. तर वैष्णव परंपरेनुसार शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजीही हा शुभ काळ पूजेसाठीदेखील वैध असेल.

राम नवमी पूजा विधि
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. प्रभू श्रीराम यांचा जन्म बरोबर दुपारी १२:०० वाजता (मध्यान्ही) झाला होता, याचवेळी पूजा करावी. भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांचा फोटो गंगाजालाने शुद्ध करून चौरगांवर स्थापित करावा. श्री रामांची मूर्ती असल्यास पंचामृताचा अभिषेकही करू शकता. मूर्तीला तुमच्या आवडीनुसार वस्त्र घालावे, फोटोला चंदनाचा टिळा लावावा, हार, फुलं अर्पण करावे. यानंतर श्री राम नवमीची षोडपोचार पूजा करावी. पूजा करताना तुपाचा दिवा लावून राम नामाचा मंत्र जप करावा. रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे किंवा रामचरितमानसातील ओळींचे पठण करणे शुभ मानले जाते. शेवटी, नैवेद्य दाखवून आरती करावी.

हे उपाय करा

-रामनवमीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न, कपडे आणि पैसे दान करावे.

-रामनवमीच्या दिवशी उपवास करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार या दिवशी उपवास करू शकता.

-जर जीवनात काही अडचणी असतील तर रामनवमीच्या दिवशी श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे फायदेशीर असते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.

-एका भांड्यात गंगाजल घेऊन ‘ॐ श्री ह्रीं क्लीं रामचंद्राय श्रीं नमः’ या राम रक्षा मंत्राचा १०८ वेळा जप करावा आणि ते पाणी घराच्या सर्व कोपऱ्यात शिंपडावे.

Comments are closed.