Summer Travel Tips: समर व्हॅकेशन प्लॅन करताय? ‘या’ ट्रॅव्हल टिप्स करा फॉलो
लवकरच उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार आहे. त्यानिमित्त अनेक जण लॉंग समर व्हॅकेशन प्लॅन करतात. बरेच लोक आपल्या कुटुंबासह हिल स्टेशन, वाळवंट किंवा समुद्रकिनाऱ्यावर जातात. मात्र या दिवसांत उन्हाचा पारा जास्त असतो. कडाक्याचे ऊन, घाम आणि गर्मीमुळे प्रवासाचा नीट आनंद घेता येत नाही. त्यामुळे प्रवास करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः जर तुम्ही लहान मुलांसोबत व्हॅकेशन प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ( Summer Vaccation Travel Tips )
कपडे
आता व्हॅकेशन म्हंटले की अनेक जण स्टायलिश कपडे खरेदी करतात. पण उन्हाळ्यात कपडे फक्त स्टायलिश असून चालत नाही, तर ते आरामदायी असणे महत्त्वाचे आहे. कारण जास्त जाड फॅब्रिकचे कपडे घातले तर तुम्हाला प्रचंड उष्णता जाणवू शकते आणि घामाचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवास करताना सुती कपडे निवडा. सुती कपडे घाम शोषून घेतात आणि शरीराला हवा खेळती राहते. तसेच गडद रंगांचे कपडे घालणे टाळा. कारण यामध्ये जास्त गर्मी होते. नेहमी फिकट रंगांचे कपडे घाला. यामुळे तुमची संपूर्ण ट्रिप आरामदायी होते. लहान मुलांनाही जास्त घट्ट कपडे घालण्याऐवजी थोडे सैल कपडे घाला. यामुळे त्यांना चालताना किंवा फिरताना त्रास होणार नाही.
आहार
उन्हाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते. त्यातच प्रवास करताना अनेकदा आपण बाहेरचे स्ट्रीटफूड, मसालेदार, तळलेले पदार्थ खातो. हे पदार्थ पचायला जड असतात. जास्त मसालेदार पदार्थ खाल्याने शरीराचे तापमान वाढू शकते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. त्यामुळे पोटाचे त्रास किंवा जळजळ, पित्त होऊ शकते. म्हणून उन्हाळ्यात प्रवास करताना नेहमी हलके पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. शिवाय केळी, टरबूज, संत्री अशी रसाळ फळे खा. ही फळे बाहेर कुठेही सहज मिळतात. प्रवासात ही फळे खाल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. तुम्ही फळांचा ज्यूसही घेऊ शकता.
हायड्रेशन
उन्हाळ्यात प्रवास करताना अनेकदा आपण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. म्हणून तुमचे शरीर हायड्रेट राहील याकडे लक्ष ठेवा. फिरायला जाताना सोबत नेहमी पाण्याची बाटली ठेवा. केवळ तहान लागल्यावरच नव्हे तर थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहा. शिवाय प्रवासात नारळ पाणी, लिंबू सरबत, ताक किंवा कोकम सरबत यांसारख्या पेयांचा समावेश करा. लहान मुले सोबत असताना बाहेर फिरायला गेलो की आपण आईस्क्रीम, कोल्ड्रींक सर्रास घेतो. पण त्यामुळे घशाला त्रास होण्याची शक्यता असते. पण कडक उन्हात जास्त थंड गोष्टी घेतल्याने घशाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो सोडा किंवा जास्त साखरेचे कोल्डड्रिंक्स घेणे टाळा.
त्वचा आणि डोळ्यांची निगा
कडक उन्हामुळे त्वचा आणि डोळ्यांचे नुकसान होते. त्यामुळे तुमचे स्किनकेअर चुकवू नका. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर बाहेर उन्हात जाण्यापूर्वी त्वचेसाठी किमान सनस्क्रीन, मॉइश्चरायझर लावा. टॅनिंग टाळण्यासाठी शॉर्ट कपडे घालणे टाळा. तसेच डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस आणि उन्हापासून बचावासाठी टोपी किंवा स्कार्फ वापरा. शक्य असल्यास स्वतःजवळ एक छोटी छत्री ठेवा.
प्रवासाची वेळ
दुपारी १२ ते ४ या वेळेत ऊन खूप कडक असते. त्यामुळे प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ५ नंतर बाहेर पडा. दुपारी शक्यतो विश्रांती घ्या किंवा इनडोअर ठिकाणी भेट द्या. जर तुम्ही स्वतःच्या कारने जाणार असाल तर एसी आणि टायरची स्थिती तपासून घ्या.
हेही महत्त्वाचे:
-उन्हाळ्यात प्रवास करताना वेट वाईप्स, ओआरएस, डोकेदुखी, उलट्या किंवा मळमळ यासाठी काही औषधे सोबत ठेवा.
-यादरम्यान जास्त हेव्ही मेकअप करणे टाळा. कारण घाम आणि उन्हामुळे तो खराब होऊ शकतो. कमीत कमी उत्पादने वापरून नॅचरल मेकअप कॅरी करा.
– उन्हाळ्यात सुट्ट्यांचा काळ असल्याने हॉटेल्स आणि फ्लाईटची तिकिटे महागतात किंवा फुल होतात, त्यामुळे नीट नियोजन करून १- २ महिने आधीच बुकिंग करा.
-या ऋतूत शक्यतो थंड हवेच्या ठिकाणी व्हॅकेशन प्लॅन करण्याला प्राधान्य द्यावे.
Comments are closed.