Parenting Mistakes : मुलांना आई-वडिलांपासून दुरावा का हवा असतो?

हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीप्रमाणे पालक आणि मुलांमधील भावनिक अंतर ही एक वाढती समस्या बनत आहे. अनेकदा असे दिसून आले की मुलं पालकांपासून अचानक दूर जात नाहीत, तर संवादातील कमतरता, भावनिक दुर्लक्ष आणि पालकांच्या वागणुकीतील काही पॅटर्न यामुळे हे अंतर हळूहळू वाढत जाते. पालक-मुलांमधील संवादाची गुणवत्ता ही नात्याच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते, आणि ती कमी झाली तर विश्वास आणि जवळीक दोन्ही कमी होतात. या पार्श्वभूमीवर, मुलं पालकांपासून दूर जाण्यामागची सखोल कारणं समजून घेणं गरजेचं आहे. (parenting tips why children distance from parents)

मुलं पालकांपासून दूर जाण्याची मुख्य करणे –

1. मुलांचं नीट ऐकून न घेणं
अनेकदा पालक मुलांना सल्ला देण्यात किंवा त्यांना समजावण्यात इतके गुंतून जातात की ते त्यांच्या भावना ऐकायलाच विसरतात. मुलं काही सांगत असताना मध्येच थांबवणं किंवा लगेच प्रतिक्रिया देणं, यामुळे त्यांना वाटतं की त्यांना समजून घेतलं जात नाही. मग हळूहळू ते बोलणं कमी करतात.

2. सतत रागावणं आणि तुलना करणं
लहान चुका झाल्या की मुलांना ओरडणं किंवा इतर मुलांशी तुलना करणं, याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू लागतात. अशा वातावरणात मुलं पालकांपासून दूर जाण्याची शक्यता वाढते. कारण स्वतः बद्दल सगळं नकारात्मक किंवा तुलनात्मक ऐकण्यापेक्षा त्यांचापासून दूर राहणं बरं असं त्यांना वाटू लागतं.

3. अति बंधनं आणि सतत टोकणं
मुलांचं रक्षण करणं महत्त्वाचं असलं, तरी त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणं त्यांना त्रासदायक वाटू शकतं. मित्र, आवडी किंवा करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य न दिल्यास मुलं स्वतःला दडपलेलं समजतात आणि संवाद टाळू लागतात. कारण अशावेळी त्यांना वाटू लागतं आपल्या मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये काही करण्याची ताकद राहत नाही. ते पालकांच्या मर्जी खातर राहत असल्या कारणाने ते शांत होऊन जातात.

4. वेळ न देणं
हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीत पालकांकडे वेळ कमी असतो. पण मुलांसाठी तुमचा वेळ सर्वात मौल्यवान असतो. महागड्या वस्तू देण्यापेक्षा त्यांच्यासोबत घालवलेला वेळ अधिक महत्त्वाचा असतो. वेळ न दिल्यास मुलं भावनिकदृष्ट्या दूर जाऊ शकतात.

5. भावनांकडे दुर्लक्ष करणं
मुलांच्या समस्या अनेकदा लहान वाटू शकतात, पण त्यांच्या दृष्टीने त्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यांच्या भावना किंवा तणाव दुर्लक्षित केल्यास त्यांना वाटू शकतं की त्यांचं कोणी ऐकत नाही. परिणामी, ते मनातील गोष्टी शेअर करणं थांबवतात.

नातं सुधारण्यासाठी काय कराल?
मुलं दूर जातात तेव्हा केवळ त्यांचीच चूक नसते. पालकांनीही आपल्या वागण्यात छोटे बदल केले, तर हे नातं पुन्हा मजबूत होऊ शकतं.
मुलांशी संवाद साधताना त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. शांतपणे ऐका, त्यांना योग्य मार्गदर्शन करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना वेळ द्या. प्रेम, विश्वास आणि संवाद या तीन गोष्टींवर नातं टिकून राहतं.

Comments are closed.