Pregnancy Exercise: गरोदरपणात व्यायाम का गरजेचा? वाचा फायदे




गरोदरपणात व्यायाम का गरजेचा? वाचा फायदे


प्रेग्नन्सी हा प्रत्येक महिलेच्या जीवनातील महत्त्वाचा काळ असतो. या काळात महिलांनी आरोग्याची काळजी घेण्यासह सक्रिय राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अमेरिकन प्रेग्नेंसी असोसिएशनच्या एका अहवालानुसार, या काळात नियमित व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि प्रसूती वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. इतकेच नाही तर प्रसूतीनंतर शरीराला पूर्ववत होण्यासही मदत होते. मात्र व्यायाम करताना खबरदारी घ्यायला हवी. ( Pregnancy Exercise Benefits And Cautions )

गरोदरपणात व्यायाम करणे सुरक्षित आहे का?
जर तुमची गर्भधारणा सामान्य असेल म्हणजेच कोणतेही कॉम्प्लिकेशन्स नसतील तर नियमित शारीरिक हालचाल सुरू ठेवणे सुरक्षित मानले जाते. योग्य पद्धतीने व्यायाम केल्याने गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूतीचा धोकाही कमी होतो. मात्र, व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्या स्त्रीरोगतज्ञांनी तुम्हाला गरोदरपणात सक्रिय राहण्याची परवानगी दिली, तर तुम्ही व्यायाम करू शकता.

व्यायामाचे फायदे
गरोदरपणात व्यायाम करण्याचे अनेक फायदे होतात. यामुळे पाठदुखी, बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि सूज कमी होते. गर्भावस्थेतील मधुमेह टाळण्यास किंवा त्यावर उपचार करण्यास मदत होते. ऊर्जा वाढते आणि मन प्रसन्न राहते. स्नायूं मजबूत होतात आणि शांत झोप लागण्यास मदत होते. तसेच बाळंतपणानंतर शरीर लवकर पूर्ववत होण्यासही मदत होते.

हे लक्षात ठेवा
गरोदरपणात तज्ञांच्या सल्ल्यानुसार काही व्यायाम सुरक्षित मानले जातात. जसे की, केगल व्यायाम, चालणे, सायकलिंग, पोहोणे, योग, नृत्य इत्यादी असे हलके व्यायाम तुम्ही करू शकता. मात्र या काळात जड व्यायाम करणे टाळावे. गरोदरपणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत पाठीवर झोपून करायचे व्यायाम टाळा, कारण यामुळे गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. याशिवाय व्यायाम करताना सैल आणि आरामदायी कपडे घाला. योग्य आणि फिट बसणारे शूज घाला. दुखापत टाळण्यासाठी नेहमी सपाट पृष्ठभागावर व्यायाम करा. व्यायाम सुरू करण्याच्या किमान एक तास आधी हलका आहार घ्या. व्यायामापूर्वी, व्यायामादरम्यान आणि व्यायामानंतर भरपूर पाणी प्या. उष्ण हवामानात व्यायाम करणे टाळा. तुमच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा.



Comments are closed.