AI मुळे होतोय मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम; तज्ञांनी दिला इशारा




AI मुळे होतोय मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम; तज्ञांनी दिला इशारा


आजकाल प्रत्येक कामासाठी एआयचा (AI) वापर वेगाने वाढत आहे. अगदी मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वच जण त्याचा वापर करत आहे. मुलांसाठी तर एआय हे मदतीचे साधन बनले आहे. एखाद्या गोष्टीसाठी मुले आता पालक किंवा मित्र- मंडळी नव्हे तर चॅटजीपीटी (ChatGPT) किंवा मेटा एआय (Meta AI) सारख्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहत आहेत. मात्र एआयवर प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहिल्याने मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होत आहे. यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होते असे तज्ञांनी म्हंटले आहे.

अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, मुले एआय वर जास्त प्रमाणात अवलंबून राहत आहेत. संशोधनानुसार, १० ते १६ वयोगटातील अंदाजे ५४ टक्के मुले आता नियमितपणे एआय साधनांचा वापर करत आहेत. चार मुलांपैकी एक आपले वैयक्तिक आणि भावनिक विचार एआयसोबत शेअर करत आहे. त्याच वेळी ६७ टक्के पालकांचा असा विश्वास आहे की, त्यांची मुले त्यांच्यापेक्षा एआयशी आपल्या भावना शेअर करणे जास्त पसंत करतात.

आजकाल मुलांना पालकांपेक्षा एआय जवळचे वाटत आहे. त्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की: एआय नेहमीच सहज उपलब्ध असते. त्यामुळे मुलांना त्यांच्या समस्या किंवा चिंता सोडवण्यासाठी वाट पाहावी लागत नाही, काही सेकंदातच मुलांना उपाय किंवा कल्पना मिळते. एआय आपल्याला जज करत नाही अशी भावना मुलांमध्ये तयार होते म्हणून ते मनमोकळेपणाने एआयशी संवाद साधतात.

मुलांच्या एआयवरील वाढत्या अवलंबित्वावर तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. याचा मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. सहज एखाद्या अडचणीवर उपाय मिळाल्याने मुले स्वतःची बुद्धी वापरत नाहीत. एआयच्या सततच्या वापरामुळे त्यांची स्मरणशक्ती कमकुवत होत आहे. मुले आता आई-वडिल किंवा मित्रांऐवजी एआयसोबत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. यामुळे समाजापासून एकप्रकारे ते दूर जात आहेत. कधीकधी एआयकडून चुकीची माहिती पसरू शकते. या सर्व बाबी मुलांसाठी घातक ठरू शकतात.

पालकांनी काय करावे?
आजच्या जगात मुलांना एआयपासून पूर्णपणे दूर ठेवणे शक्य नाही. पण एआयचा योग्य वेळी, योग्य वापर करण्यासाठी पालकांनी मुलांना सांगावे. एखाद्या अडचणीवर आधी स्वतः उपाय शोधण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे. शिवाय मुलांसोबत मोकळा संवाद ठेवा. यामुळे ते आपल्या भावना तुमच्याशी सहज शेअर करू शकतील. चुकीवर त्यांना दोष देण्याऐवजी चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करा. मुलांनी त्यांचे फोटो किंवा वैयक्तिक माहिती एआयसोबत कधीही शेअर करू नये यासाठी प्रयत्न करा.



Comments are closed.