Car Washing Tips: वारंवार कार वॉश करता? थांबा ‘या’ चुकांमुळे होतं नुकसान





कार स्वच्छ ठेवणं हे आवश्यक आहे. मात्र अनेकांना गाडीवर जरा धूळ किंवा घाण दिसली की ती धुण्याची सवय असते. नवीन गाडी घेतल्यावरही अनेकजण सतत गाडी धुतात. पण खरे तर पाण्याने वारंवार गाडी धुणे चांगले नसते. यामुळे गाडीच्या रंगावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महिन्यातून किती वेळा कार वॉश करावी? आणि यावेळी कोणत्या चुका टाळाव्यात? ते पाहूया… ( Car Washing Tips )

गाडी धुणे हे ठिकाण किंवा हवामानावर अवलंबून असते. पण तज्ञ सांगतात की, महिन्यातून दोन वेळा गाडी धुवावी. म्हणजेच पंधरा दिवसांनी एकदा कार वॉश करावी. इतर दिवशी तुम्ही कारवर थोडे पाणी टाकून स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घेऊ शकता. तुम्हाला दररोज गाडी धुण्याची गरज नाही.

जर तुम्ही जास्त पाऊस पडणाऱ्या भागात राहत असाल तर गाडी पार्क करण्यापूर्वी ती दर आठवड्याला धुवावी. पावसात चिखलामुळे गाडीचे मडगार्ड, दरवाजाच्या खालचा भाग आणि चाकांवर धूळ असू शकते. या धुळीमुळे गाडीचा रंग फिकट दिसू लागतो. शिवाय जर कार उघड्यावर पार्क केली जात असेल, तर ती जास्त धूळ व घाणीच्या संपर्कात येते अशावेळीही तुम्ही कार धुवू शकता.

गाडी केवळ बाहेरून धुणे पुरेसे नाही. आतूनही गाडीची स्वच्छता करणे गरजेचे आहे. डॅशबोर्ड, सीट आणि फ्लोअरवरील धूळ आणि घाण काढावी. हे भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करू शकता. शिवाय गाडी धुण्यासाठी साबण किंवा डिटर्जंट वापरू नये. कार वॉशिंगसाठी विशेष शॅम्पू असतात, केवळ तेच वापरायला हवेत.

अनेकजण कार चमकवण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करतात. यामुळे काही दिवसांनी रंगावर परिणाम होतो. कारच्या स्वच्छतेसाठी पाणी, मायक्रोफायबर कापड आणि कार वॉशिंग शॅम्पू या तीन वस्तूंव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा वापर करू नये.



Comments are closed.