DDH Symptoms : वरूण धवनच्या मुलीला झालेला Hip Dysplasia आजार नेमका काय?
नवजात बाळांच्या आरोग्याबाबत आपण अनेक गोष्टींकडे लक्ष देतो, पण हाडे आणि सांध्यांच्या काही समस्या सुरुवातीला सहज लक्षात येत नाहीत. अशाच गंभीर पण दुर्लक्षित आजारांपैकी एक म्हणजे हिप डिस्प्लासिया (Developmental Dysplasia of the Hip – DDH). या अवस्थेत बाळाचा खुब्याचा सांधा योग्य प्रकारे विकसित होत नाही. त्यामुळे सांधा सैल होणे, अर्धवट सरकणे किंवा पूर्णपणे बाहेर येणे अशी समस्या निर्माण होऊ शकते. वेळेवर ओळख न झाल्यास पुढे चालण्यात अडचणी, वेदना किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका वाढू शकतो.
लहान मुलांमध्ये सुरुवातीची लक्षणे कशी ओळखाल?
हा आजार सुरुवातीच्या काही महिन्यांत सहज लक्षात येत नाही. त्यामुळे पालकांनी काही संकेतांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. डायपर बदलताना बाळ त्रास देत असेल किंवा पाय सरळ करताना अडचण जाणवत असेल, तर ते एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. बाळाचे पाय एकमेकांपासून दूर करताना कडकपणा किंवा हालचालींमध्ये मर्यादा दिसल्यासही सावध राहा. मांड्यांवरील त्वचेच्या घड्या दोन्ही बाजूंना सारख्या नसतील, तर ते खुब्याच्या दोषाकडे इशारा देऊ शकते. बाळाचे दोन्ही पाय लांबीने वेगळे दिसत असतील किंवा गुडघ्यांची उंची वेगळी वाटत असेल, तर त्वरित तपासणी आवश्यक आहे. बाळ मोठं झाल्यावर चालताना लंगडणे, पाय ओढत चालणे किंवा विचित्र चाल दिसणे ही लक्षणे अधिक स्पष्ट होतात. काही वेळा चालताना खुब्यात किंवा गुडघ्यात वेदनाही जाणवू शकतात.
हा आजार होण्यामागची करणे
हिप डिस्प्लासिया होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मुलींमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळतो, कारण त्यांच्या सांध्यांचे अस्थिबंध तुलनेने सैल असतात. गर्भावस्थेत बाळाची स्थिती उलटी (ब्रीच पोझिशन) असल्यास खुब्यावर दाब येतो आणि समस्या वाढू शकते. जुळ्या मुलांच्या बाबतीत गर्भाशयात जागा कमी असल्याने सांध्यांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. कुटुंबात आधीपासून अशा प्रकारचा त्रास असल्यास बाळालाही त्याचा धोका असतो. जन्मानंतर बाळाला खूप घट्ट गुंडाळल्यास त्याच्या पायांच्या हालचालींवर मर्यादा येतात, ज्यामुळे हा आजार होण्याची शक्यता वाढते.
वेळेवर लक्ष देणं का गरजेचं?
हिप डिस्प्लासिया वेळेवर ओळखला गेला तर त्यावर उपचार करणे तुलनेने सोपं असतं. सुरुवातीच्या टप्प्यात योग्य उपकरणे किंवा थेरपीच्या मदतीने सांधा व्यवस्थित विकसित होऊ शकतो. मात्र, दुर्लक्ष केल्यास पुढे शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.
पालकांनी कोणती काळजी घ्यावी?
– बाळाच्या नियमित तपासण्या चुकवू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हिप स्क्रिनिंग करून घ्या.
– बाळाला खूप घट्ट गुंडाळण्यापेक्षा त्याला पाय हलवण्याची मोकळीक द्या.
– डायपर बदलताना किंवा बाळाला उचलताना त्याच्या पायांवर अनावश्यक दाब येणार नाही, याची काळजी घ्या.
– काहीही संशयास्पद लक्षण दिसल्यास विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
बाळाच्या आरोग्यातील लहान लक्षणेही मोठ्या समस्येचा संकेत असू शकतात. हिप डिस्प्लासिया हा असा आजार आहे, जो वेळेत ओळखल्यास पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. त्यामुळे पालकांनी सजग राहून बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवणं आणि योग्य वेळी तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
Comments are closed.