अल्कोहोलचे दुष्परिणाम: दररोज बिअर प्या? लक्ष द्या
बियर पिण्याकडे अनेकदा “हलका” किंवा “सेफ” मद्यपान म्हणून पाहिले जाते. मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारताना किंवा कामानंतर रिलॅक्स होण्यासाठी बियरचा पर्याय निवडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, ही सवय रोजची झाली, तर त्याचे परिणाम शरीरावर हळूहळू आणि गंभीर स्वरूपात दिसू लागतात. (daily beer drinking health effects risks)
यकृतावर होणारा परिणाम
मद्यपानाचा सर्वात मोठा परिणाम यकृतावर होतो आणि बियरही याला अपवाद नाही. दररोज बियर पिल्याने यकृतावर सतत ताण येतो. सुरुवातीला हे परिणाम जाणवत नाहीत, पण कालांतराने यकृतामध्ये चरबी साचू लागते, ज्याला फॅटी लिव्हर म्हटलं जातं. दीर्घकाळ ही सवय कायम राहिल्यास लिव्हर सिरोसिससारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो, ज्यामध्ये यकृताच्या पेशी कायमस्वरूपी खराब होऊ शकतात.
वजन वाढ आणि ‘बीयर बेली’
बियरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, पण त्यातून शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे दररोज बियर पिण्यामुळे शरीरात “रिकाम्या कॅलरीज” जमा होतात. याचा परिणाम म्हणून वजन वाढू लागते आणि विशेषतः पोटाचा घेर वाढतो, ज्याला ‘बीयर बेली’ म्हटलं जातं. ही स्थिती पुढे जाऊन मधुमेह आणि मेटाबॉलिक समस्यांचा धोका वाढवते.
हृदय आणि रक्तदाबावर परिणाम
काही अभ्यासांमध्ये मर्यादित प्रमाणात बियर पिण्याचे फायदे सांगितले गेले असले, तरी रोजचे सेवन मात्र धोकादायक ठरू शकते. दररोज बियर पिल्याने उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे “मर्यादा” हा इथे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो.
किडनी आणि शरीरातील पाण्याचे संतुलन
बियर हे डायुरेटिक असल्यामुळे वारंवार लघवी लागते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. दीर्घकाळ हा परिणाम कायम राहिल्यास किडनीवर ताण येतो आणि तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
बियर पिणे पूर्णपणे टाळणे शक्य नसले, तरी दररोजचे सेवन हे आरोग्यासाठी निश्चितच धोकादायक ठरते. “हलका” किंवा ”सौम्य मद्यपान” पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या सवयीचे परिणाम मात्र गंभीर असू शकतात.
Comments are closed.