Home Loan साठी अंदाजे किती पगार असणं गरजेचं?
“स्वतःचं घर घेणं … प्रत्येकाचं एक मोठं स्वप्न! पण घर बघायला गेल्यावर पहिला प्रश्न पडतो ‘होम लोन मिळेल का?’ आणि सगळ्यात महत्त्वाचं ‘नेमका किती पगार असेल तर बँक होम लोन देते?’ जर तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
होम लोन देताना बँका सर्वात आधी तुमचा पगार आणि EMI क्षमता तपासतात. यासाठी एक महत्त्वाचा नियम वापरला जातो FOIR म्हणजेच Fixed Obligation to Income Ratio. म्हणजे काय तर तुमच्या महिन्याच्या पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ही EMI मध्ये जाता कामा नये.
म्हणजे समजा तुमचा पगार १ लाख रुपये असेल, तर तुमचे सर्व कर्जाचे हप्ते मिळून ५० हजारांच्या आत असणं गरजेचं असतं. मग यामध्ये फक्त होम लोन नाही तर आधीच सुरू असलेलं कार लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डचे हप्तेही मोजले जातात. म्हणूनच जुनी कर्जं जास्त असतील, तर होम लोनची पात्रता कमी होऊ शकते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वय आणि लोनचा कालावधी. तुम्ही जितक्या कमी वयात होम लोन घेता, तितका जास्त कालावधी मिळू शकतो. काही वेळा हा कालावधी ३० वर्षांपर्यंतही जातो. यामुळे तुमचा EMI कमी होतो आणि लोन मंजूर होण्याची शक्यता वाढते.
होम लोन मिळवताना CIBIL Score सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. जर तुमचा सिबिल स्कोअर ७५० पेक्षा जास्त असेल, तर बँका कमी व्याजदरात कर्ज देण्यास प्राधान्य देतात. पगार कमी असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही पती किंवा पत्नीला Co-applicant म्हणून जोडू शकता. यामुळे दोघांचं मिळून उत्पन्न धरलं जातं आणि जास्त रकमेचं लोन मिळू शकतं.”
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे Down Payment. बँक साधारणपणे घराच्या किमतीच्या ७० ते ८० टक्केच कर्ज देते. उरलेली २० ते ३० टक्के रक्कम तुम्हाला स्वतः भरावी लागते. म्हणून घर घेण्याआधी फक्त EMI नाही तर पगार, सिबिल स्कोअर, जुनी कर्जं आणि डाउन पेमेंट या सगळ्या गोष्टींचं योग्य प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे.
Comments are closed.