पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाण्यापूर्वी या गोष्टी जरूर जाणून घ्या

पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्या की गरमागरम भजी, वडा पाव, पाणीपुरी, भेळ आणि मक्याचा सुगंध अनेकांना रस्त्याकडे खेचतो. पावसाळा आणि स्ट्रीट फूड यांचं नातं जणू काही अतूटच आहे. मात्र जिभेचे चोचले पुरवताना आरोग्याचा विचार करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. कारण याच ऋतूमध्ये अन्न दूषित होण्याचा आणि पोटाच्या संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो.

रस्त्यावरील चटकदार पदार्थांचा मोह आवरणे कठीण असले तरी काही साध्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पावसाळ्यातही सुरक्षितपणे खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता.

गरम पदार्थ
पावसाळ्यात ताजे आणि गरम अन्न खाणे सर्वात सुरक्षित मानले जाते. भजी, वडा पाव किंवा भाजलेला मका यांसारखे पदार्थ ताजे बनवले जात असतील तर त्यातून संसर्गाचा धोका तुलनेने कमी असतो.

पाणीपुरी, कच्च्या पदार्थांपासून सावध
पाणीपुरी, कापलेली फळे किंवा आधीच तयार ठेवलेले सलाड यामध्ये वापरले जाणारे पाणी आणि स्वच्छता याबाबत खात्री नसते. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन करताना विशेष काळजी घ्यावी.

स्वच्छतेकडे लक्ष द्या
स्टॉलवरील भांडी, विक्रेत्याचे हात, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि परिसराची स्वच्छता पाहूनच पदार्थ खरेदी करा आणि मगच खा. स्वच्छता हीच पावसाळ्यातील सुरक्षित खाण्याची पहिली अट आहे.

तेलकट पदार्थ
सतत तळलेले आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने अपचन, अॅसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे प्रमाणातच स्ट्रीट फूडचा आनंद घ्या.

पॅकबंद आणि स्वच्छ पाणी
खाद्यपदार्थांसोबत नेहमी पॅकबंद किंवा सुरक्षित पाणी प्या. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर, पावसाळ्यात बऱ्याचदा घरीसुद्धा पाणी दूषित येण्याची समस्या जाणवते त्यामुळे दररोज पाणी गाळून व उकळूनच प्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ
स्ट्रीट फूडसोबतच आहारात सूप, हळदीचे दूध, फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

पावसाळ्यातील गरमागरम पदार्थांची मजा काही वेगळीच असते. मात्र क्षणिक चवीसाठी आरोग्य धोक्यात घालणे योग्य नाही. थोडी काळजी आणि योग्य निवड केल्यास तुम्ही मॉन्सूनमधील स्ट्रीट फूडचा आनंदही घेऊ शकता आणि आरोग्यही जपू शकता.

Comments are closed.