रात्री जेवताना भात खावा की चपाती?




रात्री जेवताना भात खावा की चपाती?


दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री जेवणाच्या वेळी अनेक घरांमध्ये एक प्रश्न हमखास उपस्थित होतो आज भात खायचा की चपाती? वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे अनेक जण भाताला दोष देतात, तर काहींना चपातीशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. पण खरंच या दोन्हींपैकी कोणता पर्याय अधिक चांगला आहे का? की हा निर्णय आपल्या शरीराच्या गरजांवर अवलंबून असतो?

वर्षानुवर्षे भातामुळे वजन वाढते, अशी समजूत अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे रात्रीच्या जेवणातून भात पूर्णपणे वगळणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते, केवळ भात किंवा चपाती यापैकी एकाला दोष देणे योग्य नाही. वजन वाढण्यामागे एकूण आहार, प्रमाण आणि लाईफस्टाइलचा मोठा वाटा असतो.

पचनासाठी योग्य पर्याय?
अनेकांना रात्री भात खाल्ल्यानंतर हलके वाटते. कारण भात तुलनेने लवकर पचतो. ज्यांना पचनाच्या समस्या आहेत किंवा रात्री उशिरा जेवावे लागते, त्यांच्यासाठी भात फायदेशीर ठरू शकतो. दुसरीकडे चपातीतील फायबर अधिक असल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते.

वजन कमी करत असाल तर…
वजन कमी करण्यासाठी भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते. महत्त्वाचे म्हणजे प्रमाणावर नियंत्रण ठेवणे. भातासोबत भरपूर भाज्या, डाळ किंवा प्रथिनेयुक्त पदार्थ घेतल्यास जेवण अधिक संतुलित बनते. त्याचप्रमाणे चपाती खातानाही अतिरिक्त तेलकट पदार्थ टाळणे आवश्यक आहे.

झोपेवरही होतो परिणाम
रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित असेल तर झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. खूप जड किंवा जास्त प्रमाणातील जेवणामुळे अपचन, जळजळ किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे भात असो किंवा चपाती, अतिरेक टाळणे हेच महत्त्वाचे.

म्हणूनच भात आणि चपाती यामध्ये एक काहीतरी  ठरवण्यापेक्षा आपल्या शरीराची गरज समजून घेणे अधिक आवश्यक आहे. जर तुम्हाला भात खाल्ल्यानंतर आरामदायी वाटत असेल तर तो योग्य प्रमाणात खाण्यात गैर नाही. तर काहींसाठी चपाती अधिक फायदेशीर ठरू शकते. पण दोघांचेही योग्य प्रमाण असणे महत्वाचे आहे.



Comments are closed.