चेहऱ्यावर हॉट वॅक्स करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

चेहऱ्यावरील अनावश्यक केस अनेक महिलांसाठी त्रासाचे कारण ठरतात. विशेषतः अपर लिप्स आणि हनुवटीवर दिसणारे केस आत्मविश्वास कमी करू शकतात. त्यामुळे अनेकजणी फेस वॅक्सिंगचा पर्याय निवडतात. मात्र चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत अधिक नाजूक असते. त्यामुळे हॉट वॅक्स करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. एका छोट्याशा चुकीमुळे त्वचेवर लालसरपणा, जळजळ किंवा डागही पडू शकतात.

पहिल्यांदाच असेल तर घाई नको
पहिल्यांदा फेस वॅक्स करण्याचा निर्णय घेताना अनेकजणी थेट पार्लरमध्ये जाऊन प्रक्रिया करून घेतात. मात्र त्वचेची प्रतिक्रिया कशी असेल, याचा विचार केला जात नाही. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतेही नवीन ब्युटी ट्रीटमेंट करण्यापूर्वी त्याबद्दल योग्य माहिती घेणे आवश्यक आहे.

त्वचेचा प्रकार
हॉट वॅक्स करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखणे. जर त्वचा पटकन लाल होत असेल, खाज येत असेल किंवा सौंदर्यप्रसाधनांमुळे लगेच प्रतिक्रिया देत असेल, तर हॉट वॅक्स टाळणे चांगले. अशा वेळी कोल्ड वॅक्स किंवा इतर सौम्य पर्याय अधिक सुरक्षित ठरू शकतात.

वॅक्सचे तापमान
अनेकदा जास्त तापमानाचे वॅक्स थेट त्वचेवर लावले जाते. यामुळे त्वचा भाजण्याचा धोका वाढतो. चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असल्याने वॅक्स योग्य तापमानात आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. थोडासा निष्काळजीपणा त्वचेवर कायमचे डाग सोडू शकते.

वॅक्सिंगपूर्वी त्वचेची स्वच्छता
चेहऱ्यावर मेकअप, तेल किंवा धूळ असल्यास वॅक्सिंगचा परिणाम चांगला मिळत नाही. त्यामुळे वॅक्स करण्यापूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने स्वच्छ धुवावा. स्वच्छ त्वचेवर वॅक्स अधिक प्रभावीपणे काम करते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

घ्या विशेष काळजी
फेस वॅक्सिंगनंतर काही तास त्वचा अधिक संवेदनशील असते. त्यामुळे लगेच उन्हात जाणे, स्क्रब वापरणे किंवा केमिकलयुक्त उत्पादने लावणे टाळावे. त्वचेला थंडावा देणारे जेल किंवा मॉइश्चरायझर वापरल्यास जळजळ आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील अनावश्यक केस दूर करण्यासाठी हॉट वॅक्स हा एक पर्याय असू शकतो, पण त्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेचा प्रकार, वॅक्सचे तापमान आणि वॅक्सिंगनंतरची काळजी या गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचेचे नुकसान टाळता येते.

Comments are closed.