EFT Tapping : मूड फ्रेश करण्याचा सोपा फॉर्म्युला ‘बॉडी टॅपिंग’

अलार्म वाजतो, डोळे उघडतात, पण शरीरात उत्साह नसतो. अनेकांना सकाळी उठताच थकवा, ताण, चिडचिड किंवा शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना जाणवतात. दिवसाची सुरुवातच नकारात्मक भावनांनी होत असल्याने संपूर्ण दिवसाचा मूड बिघडतो. अशा वेळी औषधांऐवजी एक साधी सवय तुमच्या मदतीला येऊ शकते. तिचं नाव आहे बॉडी टॅपिंग. अवघ्या काही मिनिटांत शरीर आणि मनाला आराम देणारी ही पद्धत सध्या जगभरात लोकप्रिय आहे.

बॉडी टॅपिंग म्हणजे काय?
बॉडी टॅपिंग किंवा इमोशनल फ्रीडम टेक्निक ही शरीर आणि मन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याची एक सोपी पद्धत मानली जाते. यामध्ये शरीराच्या विशिष्ट भागांवर बोटांनी किंवा हाताने हलके टॅप केले जाते. या प्रक्रियेमुळे शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते आणि मन अधिक शांत वाटू लागते.

तणावावर कशी करते काम
जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा शरीरात कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण वाढते. बॉडी टॅपिंग करताना श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मन शांत होऊ लागते. अनेक तज्ज्ञांच्या मते यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत मिळू शकते. परिणामी दिवसाची सुरुवात अधिक हलकी आणि उत्साही वाटते.

फक्त 5 मिनिटांत जाणवू शकतो फरक
बॉडी टॅपिंगची खास गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज नसते. सकाळी उठल्यानंतर किंवा तणाव जाणवत असताना काही मिनिटे हात, खांदे, मान, चेहरा किंवा छातीच्या भागावर हलके टॅप करणे पुरेसे ठरू शकते. यावेळी खोल श्वास घेणे आणि सकारात्मक विचार मनात ठेवणे अधिक फायदेशीर मानले जाते.

शरीरातील वेदना कमी होतात
दीर्घकाळ ताणतणावात राहिल्याने अनेकदा स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो. त्यामुळे मानदुखी, पाठदुखी किंवा खांदेदुखी जाणवू शकते. टॅपिंगमुळे शरीराकडे अधिक जागरूकतेने लक्ष दिले जाते. त्यामुळे काही लोकांना वेदनांची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव येतो.

असं करा बॉडी टॅपिंग
सर्वप्रथम शांत जागी बसा. काही खोल श्वास घ्या. त्यानंतर कपाळ, गाल, हनुवटी, छाती, हात किंवा खांद्यांवर हलक्या हाताने टॅपिंग सुरू करा. प्रत्येक भागावर काही सेकंद टॅप करताना स्वतःला सकारात्मक वाक्ये सांगा. उदाहरणार्थ, मी शांत आहे किंवा मी स्वतःला स्वीकारतो. ही प्रक्रिया 5 ते 10 मिनिटे करा.

Comments are closed.