Tea Side Effects : जेवणानंतर लगेच चहा पिण्याची सवय पडू शकते महागात
आपल्या अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट चहाशिवाय होत नाही. पण जेवण झाल्यानंतर लगेचच चहाचा कप हातात घेण्याची सवय आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. रोजच्या धकाधकीत अनेक जण जेवणानंतर चहा पिणे अगदी सामान्य मानतात, मात्र ही सवय पचनसंस्थेवर आणि शरीरातील पोषणतत्त्वांच्या शोषणावर परिणाम करू शकते.
पचन प्रक्रिया बिघडते
तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर लगेच चहा घेतल्यास अन्न पचण्याची प्रक्रिया मंदावू शकते. त्यामुळे पोट फुगणे, गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. चहामध्ये असणारे टॅनिन हे घटक अन्नातील लोहाशी संयोग करतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले लोह योग्य प्रमाणात शोषले जात नाही.
अॅनिमियाचा धोका
जे लोक नियमितपणे जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा घेतात, त्यांच्यामध्ये लोहाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता वाढते. दीर्घकाळ ही सवय राहिल्यास रक्ताल्पता म्हणजेच अॅनिमियाचा धोका वाढू शकतो. विशेषतः महिलांनी आणि किशोरवयीन मुलांनी याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
रात्रीच्या जेवणानंतर चहा टाळावा
चहामध्ये असलेले कॅफीन शरीराला सतर्क ठेवते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर चहा घेतल्यास झोप येण्यास उशीर होऊ शकतो. काही लोकांमध्ये रक्तदाब वाढणे किंवा अस्वस्थता जाणवण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
चहा पिण्याची योग्य वेळ
आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही खाल्ल्यानंतर किमान एक तासाने चहा घ्यावा. चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये. तसेच दिवसातून एक ते दोन कपांपेक्षा जास्त चहा घेणे टाळावे. योग्य वेळी आणि मर्यादित प्रमाणात घेतलेला चहा आनंद देतो, मात्र चुकीच्या वेळी घेतल्यास तो आरोग्यावर परिणाम करू शकतो.
म्हणूनच, पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीराला आवश्यक पोषकतत्त्वांचा लाभ मिळवण्यासाठी चहा आणि जेवण यामध्ये योग्य अंतर ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
Comments are closed.