Monsoon Plant Care : पावसाळ्यात रोपांची घ्या अशी काळजी




पावसाळ्यात रोपे वाचवायची असतील तर ही ट्रिक येईल कमी


पावसाळा आला की घरातील बाग पुन्हा हिरवीगार होते. नव्या पालवीने फुललेली झाडे पाहून मन प्रसन्न होते. मात्र मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे अनेकदा आवडीची झाडे डोळ्यांसमोर तुटून पडतात. महागडी गार्डनिंग साधने खरेदी करण्याऐवजी घरात पडलेल्या जुन्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करूनही झाडांना मजबूत आधार देता येतो. हा सोपा आणि कमी खर्चाचा उपाय सध्या अनेक गार्डनप्रेमींमध्ये लोकप्रिय होत आहे.

फेकून दिलेली बाटली
पावसाळ्यात कुंडीतील माती सतत ओलसर राहिल्याने झाडांच्या मुळांची पकड सैल होते. त्यात जोरदार वाऱ्याचा तडाखा बसला की नाजूक खोड असलेली झाडे वाकतात किंवा तुटतात. अशा वेळी प्लास्टिकच्या जुन्या बाटल्यांपासून तयार केलेला आधार झाडांना स्थिर ठेवण्यास मदत करतो. हा उपाय केवळ स्वस्त नाही तर पर्यावरणपूरकही आहे.

बाटलीचा वापर कसा कराल
1) मोठी प्लास्टिकची बाटली घ्या. तिचा वरचा आणि खालचा भाग कापून मधला भाग वेगळा करा. हा भाग एका बाजूने कापून झाडाच्या खोडाभोवती हलक्या हाताने गुंडाळा. त्यानंतर बाटलीचा काही भाग मातीमध्ये दाबून बसवा. त्यामुळे खोडाला अतिरिक्त संरक्षण मिळते.

2) दुसरा उपाय म्हणजे बाटलीमध्ये कोरडी माती, वाळू किंवा छोटे दगड भरून ती जड करणे. ही बाटली झाडाच्या बाजूला मातीमध्ये घट्ट रोवा आणि सुती कापड किंवा ज्यूटच्या दोरीने झाडाला हलक्या हाताने बांधा. त्यामुळे वाऱ्याचा जोर थेट झाडावर पडत नाही.

या चुका टाळा
बाटली रोवताना ती मुळांच्या अगदी जवळ लावू नका. त्यामुळे मुळे खराब होऊ शकतात. तसेच झाड बांधताना दोरी खूप घट्ट बांधल्यास खोडाला इजा होण्याचा धोका असतो. आधार मजबूत असावा पण झाडाच्या वाढीला अडथळा ठरू नये.

अतिरिक्त टिपा
– पावसाळ्यात उंच झाडांसाठी बांबूची काठी वापरा.
– कुंड्यांमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होत आहे याची खात्री करा.
– जड फांद्या वेळोवेळी छाटल्यास वाऱ्याचा ताण कमी होतो.
– छतावरील किंवा बाल्कनीतील कुंड्या भिंतीलगत ठेवा.
– वादळी पावसाचा इशारा असल्यास नाजूक झाडे तात्पुरती सुरक्षित ठिकाणी हलवा.
– ज्यूट किंवा कापडी पट्टी वापरा. लोखंडी तार थेट खोडाला बांधू नका.
– कुंडी खूप हलकी असल्यास तळाशी दगड ठेवा, त्यामुळे ती उलटण्याची शक्यता कमी होते.



Comments are closed.