कागदात गुंडाळलेले पदार्थ खाण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची माहिती
रेल्वे स्टेशन, बसस्थानके, चौकातील गाड्या किंवा अगदी घराजवळची टपरी असो, गरमागरम वडापाव, समोसा किंवा भजी वर्तमानपत्राच्या तुकड्यावर घेऊन खाण्याची सवय अनेकांना असते. अनेकदा घरातही पोळी, पराठे किंवा स्नॅक्स गुंडाळण्यासाठी जुना कागद वापरला जातो. ही गोष्ट अगदी सामान्य वाटत असली तरी त्यामागे लपलेला आरोग्याचा धोका अनेकांना माहिती नसतो.
वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये विविध रसायने आणि रंगद्रव्ये असतात. गरम, तेलकट किंवा ओलसर पदार्थांचा या कागदाशी संपर्क आला की त्यातील काही घटक अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता वाढते. हे घटक थेट आपल्या शरीरात पोहोचू शकतात. वारंवार अशी सवय राहिल्यास त्याचा परिणाम पचनसंस्थेपासून ते एकूण आरोग्यावर येऊ शकतो.
कोणते धोके वाढू शकतात
तज्ज्ञांच्या मते, दूषित रसायनांचा संपर्क वाढल्यास अपचन, पोटदुखी, अॅसिडिटी आणि पचनाशी संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळ अशा प्रकारे अन्न सेवन केल्यास शरीरावर नकोसे परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
घरातही होतेय हीच चूक
अनेक घरांमध्ये उरलेल्या पोळ्या किंवा नाश्ता वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवण्याची सवय असते. मात्र हा प्रकारही टाळायला हवा. गरम किंवा ताज्या पदार्थांमधील ओलावा आणि तेलामुळे शाईतील घटक अन्नात जाऊ शकतात.
सुरक्षित पर्याय कोणते
अन्नपदार्थ साठवण्यासाठी फूड ग्रेड पेपर वापरा. बटर पेपर हा अधिक सुरक्षित पर्याय आहे. स्टील किंवा काचेचे डबे वापरणे उत्तम. अॅल्युमिनियम फॉइलचा मर्यादित वापर करता येतो. पुनर्वापर करता येणारे फूड कंटेनर अधिक सुरक्षित ठरतात. रस्त्यावरील खाद्यपदार्थ घेताना ते थेट वर्तमानपत्रावर दिले जात नाहीत ना याची खात्री करा. मुलांना वर्तमानपत्रात गुंडाळलेले स्नॅक्स देणे टाळा.गरम भजी, वडे किंवा समोसे घेताना विक्रेत्याकडे टिश्यू किंवा फूड पेपरची मागणी करा. घरात जुन्या वर्तमानपत्रांचा वापर फक्त साफसफाई किंवा इतर कामांसाठी करा. अन्नाचा थेट संपर्क कोणत्याही छापील कागदाशी येणार नाही याची काळजी घ्या.
Comments are closed.