Toothpick Uses : घरातील कामांसाठी टूथपिकचा भन्नाट वापर

दातात अडकलेले अन्न काढण्यासाठी आपण टूथपिक वापरतो, एवढेच बहुतेकांना माहिती असते. पण स्वयंपाकघरात पडून असलेली ही छोटीशी लाकडी काडी किती उपयोगी ठरू शकते, याचा अनेकांना अंदाजही नसतो. अवघ्या एका रुपयात मिळणारी टूथपिक घरातील दैनंदिन कामे सोपी करण्यापासून गार्डनिंग, बेकिंग, साफसफाई आणि छोट्या दुरुस्तीपर्यंत अनेक ठिकाणी मदत करू शकते. एकदा हे भन्नाट उपयोग समजले की, पुढच्या वेळी टूथपिकचा वापर फक्त दात स्वच्छ करण्यापुरता मर्यादित राहणार नाही. जाणून घेऊयात छोटी वाटणाऱ्या टूथपिकचे भन्नाट उपयोग.

छोट्या रोपांना द्या आधार
घरात लावलेल्या नव्या किंवा नाजूक रोपांना सरळ वाढण्यासाठी आधाराची गरज असते. अशावेळी टूथपिक छोट्या आधारकाठीसारखी वापरता येते. त्यामुळे रोप वाकत नाही आणि व्यवस्थित वाढते.

केक बेक चेकर
केक किंवा ब्रेड बेक करताना मध्ये टूथपिक घाला. ती स्वच्छ बाहेर आली तर केक पूर्णपणे शिजला आहे, अन्यथा त्याला अजून थोडा वेळ द्यावा.

गोंद लावण्यासाठी
क्राफ्ट प्रोजेक्ट, शोपीस किंवा तुटलेली वस्तू चिकटवताना गोंद जास्त प्रमाणात लागतो. टूथपिकच्या मदतीने अगदी बारीक जागेतही गोंद अचूकपणे लावता येतो.

मोबाईल,कीबोर्डची स्वच्छता
मोबाईलचे स्पीकर, चार्जिंग पोर्ट किंवा कीबोर्डमधील बटनांच्या फटीत धूळ साचते. काळजीपूर्वक टूथपिक वापरल्यास ही घाण सहज काढता येते. मात्र जास्त जोर लावू नका.

स्नॅक्सची सजावट
फळांचे तुकडे, सँडविच, कबाब किंवा पार्टी स्नॅक्स सुंदर पद्धतीने सर्व्ह करण्यासाठी टूथपिकचा वापर करता येतो. त्यामुळे पदार्थ अधिक आकर्षक दिसतात.

भोक स्वच्छ करा
मसाल्यांच्या बाटल्यांमधील छोटे छिद्र अनेकदा बंद होतात. टूथपिकने ते सहज साफ करता येतात आणि मसाले पुन्हा व्यवस्थित बाहेर येतात.

नेल आर्टसाठी वापर
महागडी नेल आर्ट किट न घेता टूथपिकच्या साहाय्याने नखांवर डॉट्स, फुलं किंवा बारीक डिझाइन सहज तयार करता येतात.

सेलोटेपचा शेवट
सेलोटेप वापरल्यानंतर त्याच्या टोकाखाली एक टूथपिक ठेवली तर पुढच्या वेळी टेपचे टोक शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही.

घरात सहज उपलब्ध असणारी आणि अगदी स्वस्त असलेली टूथपिक ही फक्त दात स्वच्छ करण्यापुरती मर्यादित नाही. स्वयंपाकघर, घराची साफसफाई, गार्डनिंग, सजावट आणि छोट्या दुरुस्तीपर्यंत अनेक कामांमध्ये ती वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवते.

Comments are closed.