पावसाळ्यात मका खाण्याचे फायदे काय? एका क्लिकवर जाणून घ्या माहिती
बाहेर मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, हातात वाफाळलेला चहा आणि गरमागरम मका.. हे सर्व म्हणजे पावसातलं खरं सुख. पावसात भाजलेल्या मक्यावर लिंबू किंवा मीठ लावून खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. या दिवसात आवडीने खाल्ला जाणारा मका आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटामिन A,B, E , खनिजे, फायबर आणि ऍटीऑक्सिडंट्स असतात. एकूणच, मका पावसाळ्यातील सुपरफूड आहे. आजच्या लेखात मका खाण्याचे काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊयात.
अशक्तपणावर प्रभावी –
महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये या दिवसात अशक्तपणाची समस्या प्रकर्षाने जाणवते. अशक्तपणाचे प्रमुख लक्षण म्हणजे थकवा जाणविणे. पावसाळ्यातील वातावरणामुळे आणि विविध संसर्गामुळे सतत थकवा जाणवतो. अशावेळी तुम्ही मका खायला हवा. मका खाल्ल्याने लाल पेशी तयार होतात तसेच रक्ताची कमतरता देखील दूर होते.
व्हिटॅमिन्सने समृद्ध –
मका व्हिटॅमिन B ने समृद्ध आहे, जे केस आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. याशिवाय यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे इम्युनिटी पॉवर वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.
डोळ्यांचे आरोग्य –
मक्याचे कणीस खाल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. यातील व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन पोषक घटक दृष्टी सुधारण्यास फायदेशीर ठरतात. यासाठी तुम्ही पावसात मका हमखास खायला हवा.
त्वचेसाठी फायदेशीर –
मक्यामध्ये बीटा कॅरोटिनचे प्रमाण अधिक असते. यामुळे डोळ्यांसह त्वचेचे आरोग्य राखले जाते. तसेच यातील अँटीऑक्सीडेंट्समुळे वृद्धत्वाच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.
वेट लॉससाठी उपयुक्त –
मक्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. जर तुमचे पोट भरलेले असेल तर तुम्ही आपसूकच कमी खाणार. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
महत्त्वाची टीप –
मका खाताना तो नेहमी स्वच्छ ठिकाणी भाजलेला किंवा चांगला उकडलेला असावा. चीज, बटर लावून खाण्यापेक्षा लिंबाचा रस पिळून मका खायला हवा, शरीराला अधिक फायदा होईल.
हेही वाचा – पावसाळ्यात कोणती फळे खावीत?
Comments are closed.