नेहमी चिडचिड, थकवा आणि ओव्हरथिंकिंग? Millennialsमध्ये वाढतोय ‘सायलेंट स्ट्रेस’
चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, स्वतःचं घर, आर्थिक स्थैर्य हे सगळं मिळवण्यासाठी Millennials पिढीने खूप मेहनत घेतली. बाहेरून त्यांचं आयुष्य व्यवस्थित दिसत असलं, तरी आतून अनेकजण सतत थकलेले, चिडचिडे आणि मानसिकदृष्ट्या गुदमरल्यासारखे वाटत असल्याचं सांगतात. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या धडपडीत ही पिढी अनेकदा स्वतःलाच विसरत आहे. ही मानसिक घुसमट नेमकी का वाढते आहे याचं नेमकं कारण जाणून घेऊयात.
Millennials म्हणजे नेमकं कोण?
साधारण 1981ते 1996 या काळात जन्मलेल्या व्यक्तींना Millennials म्हटलं जातं. ही पिढी इंटरनेटपूर्व काळ आणि डिजिटल युग या दोन्हींचा अनुभव घेऊन मोठी झाली आहे. त्यामुळे करिअर, कुटुंब, आर्थिक जबाबदाऱ्या आणि बदलत्या जगाशी जुळवून घेण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
यश मिळालं… पण समाधान नाही?
अनेक Millennials चांगल्या पदावर काम करत असतात, आर्थिकदृष्ट्या स्थिर असतात. तरीही “आणखी काहीतरी करायला हवं”, “मी मागे तर पडत नाही ना?” अशी भावना त्यांना सतत अस्वस्थ ठेवते. त्यामुळे मिळालेल्या यशाचा आनंदही अनेकदा घेता येत नाही. इन्स्टाग्राम, लिंक्डइन किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इतरांचं यश, प्रवास, घर, करिअर आणि लाइफस्टाइल पाहून नकळत स्वतःची तुलना सुरू होते.
“त्याच्याकडे सगळं आहे मग मीच मागे का?”
हा विचार मनावर ताण वाढवू शकतो. चांगली नोकरी, फिट शरीर, आनंदी नातं, आर्थिक गुंतवणूक, सोशल लाइफ प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम असण्याचा प्रयत्न मानसिक थकवा वाढवतो. अनेक Millennials अजूनही पालक, कुटुंब, जोडीदार किंवा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. स्वतःच्या इच्छेपेक्षा “लोक काय म्हणतील?” किंवा “सगळ्यांना आनंदी ठेवायला हवं” हा विचार त्यांना सतत ताणाखाली ठेवतो. करिअर, घर, कर्ज, मुलांचं संगोपन आणि आर्थिक नियोजन यामध्ये अनेक Millennials इतके गुंततात की स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष होतं.
म्हणूनच तज्ज्ञांच्या मते सुद्धा Millennials ही अशी पिढी आहे जिने सतत बदलणाऱ्या जगाशी जुळवून घेत स्वतःचं स्थान निर्माण केलं. पण या प्रवासात स्वतःच्या मनाकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे.
Comments are closed.