वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी 5 मिनिटांचे स्ट्रेचिंग रूटीन

हल्ली ऑफिसचं काम असो किंवा वर्क फ्रॉम होम, अनेकजण दिवसातील 8 ते 10 तास लॅपटॉपसमोर बसून काम करतात. सतत एकाच जागी बसल्यामुळे मान, खांदे, पाठ आणि कंबर दुखणे, शरीर आखडणे तसेच थकवा जाणवणे अशा समस्या वाढू लागतात. अशा वेळी दररोज फक्त 5 मिनिटांचे स्ट्रेचिंग शरीराला आराम देण्यास, स्नायूंवरील ताण कमी करण्यास आणि दिवसभर अधिक उत्साही ठेवण्यास मदत करू शकते.

1) नेक स्ट्रेच (30 सेकंद)
डोके हळूहळू उजव्या आणि डाव्या बाजूला झुकवा. त्यानंतर पुढे आणि मागे हलक्या हालचाली करा. असे केल्यास मानेतील ताण कमी होतो आणि दीर्घकाळ स्क्रीनसमोर बसल्यामुळे मान जड होते ते कमी होण्यास मदत होते.

२) शोल्डर रोल (१ मिनिट)
दोन्ही खांदे पुढून मागे आणि मागून पुढे गोलाकार फिरवा. यामुळे खांद्यातील ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

3) बसलेला पाठीचा कणा वळणे (1 मिनिट)
खुर्चीवर बसून शरीराचा वरचा भाग हळूच उजवीकडे आणि डावीकडे वळवा. काही सेकंद ही स्थिती कायम ठेवा. पाठीचा कणा लवचिक राहतो आणि कमरेवरील ताण कमी होतो.

4) हॅमस्ट्रिंग आणि लेग स्ट्रेच (1 मिनिट)
एक पाय समोर सरळ करून पंजा स्वतःकडे ओढा आणि शरीर थोडं पुढे झुकवा. नंतर दुसऱ्या पायानेही हेच करा. ह्याने पायातील स्नायू मोकळे होतात आणि दीर्घकाळ बसल्यामुळे येणारा ताण कमी होतो.

5) मनगट आणि बोटांचे स्ट्रेच (1 मिनिट)
एक हात समोर करून दुसऱ्या हाताने बोटं हलकेच मागे आणि पुढे ओढा. दोन्ही हातांनी ही क्रिया करा. कीबोर्ड आणि माऊसचा सतत वापर करणाऱ्यांसाठी मनगटावरील ताण कमी होण्यास मदत होते.

दिवसभर बसून काम करणं अनेकांसाठी गरजेचं असलं, तरी त्याचा शरीरावर होणारा परिणाम कमी करणं आपल्या हातात आहे. दररोज फक्त 5 मिनिटे स्ट्रेचिंग करण्याची सवय लावल्यास शरीर अधिक सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते.

Comments are closed.