अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामन्यात कोणाची चालणार जादू? या सहा खेळाडूंवर असणार नजर
नवी दिल्ली : फिफा विश्वचषक 2026 चा दुसरा उपांत्य सामना अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. अटलांटा येथे होणारा हा सामना केवळ दोन बलाढ्य संघांमधील संघर्ष नाही, तर जगातील काही महान फुटबॉलपटूंचाही सामना आहे. अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड यांच्यातील या अटीतटीच्या लढतीत लिओनेल मेस्सी, ज्यूड बेलिंगहॅम, हॅरी केन आणि इतर अनेक स्टार खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. 24 वर्षांनंतर हे दोन संघ एखाद्या मोठ्या स्पर्धेतील बाद फेरीत (नॉकआउट) आमनेसामने येत आहेत. त्यामुळे अंतिम फेरीचे तिकीट मिळवणे हे दोन्ही संघांचे लक्ष असणार आहे. अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या सहा खेळाडूंवर एक नजर टाकूया…
सद्यस्थितीत जगज्जेता असलेला अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे. या विश्वचषकात 608 मिनिटे खेळताना त्याने 8 गोल आणि 2 असिस्टची नोंद केली आहे. मेस्सीने अल्जेरियाविरुद्ध हॅट्ट्रिक साधून स्पर्धेची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने ऑस्ट्रिया, जॉर्डन, केप वर्डे आणि इजिप्तविरुद्धही गोल केले आहेत. ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीतही तो आघाडीच्या खेळाडूंपैकी एक आहे. मात्र आता विश्वचषकाच्या सामन्यात मेस्सी पहिल्यांदाच इंग्लंडचा सामना करणार आहे. त्यामुळे डिएगो मॅराडोना यांनी एकेकाळी जे केले होते, तसाच पराक्रम करत इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारण्याचे त्याचे ध्येय असेल.
‘इंटर मिलान’चा स्ट्रायकर लाउटारो मार्टिनेज याने या विश्वचषकात 347 मिनिटे खेळताना 2 गोल आणि 1 असिस्टचे योगदान दिले आहे. स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात ‘एक्स्ट्रा टाइम’मध्ये तिसरा गोल करून त्याने अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. गेल्या दोन सामन्यांत तो राखीव खेळाडू (सबस्टिट्यूट) म्हणून मैदानात उतरला होता, मात्र त्याची गोल करण्याची त्याची क्षमता ही अर्जेंटिनाच्या सर्वात मोठ्या जमेच्या बाजूंपैकी एक राहिली आहे.
लिव्हरपूलचा मिडफिल्डर अलेक्सिस मॅक ॲलिस्टर हा अर्जेंटिनाच्या खेळाचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. या विश्वचषकात त्याने 540 मिनिटे खेळताना एक गोल आणि एका असिस्टची नोंद केली आहे. स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात मेस्सीने दिलेल्या पासवर त्याने पहिला गोल केला होता. जरी त्याची आकडेवारी फारशी प्रभावी वाटत नसली, तरी बचाव फळी आणि आक्रमण फळी यांच्यात समन्वय साधण्यात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याचा ‘प्रीमियर लीग’मधील अनुभवही उपयुक्त ठरू शकतो.
इंग्लंडचा कर्णधार आणि 2018 रशिया विश्वचषकातील ‘गोल्डन बूट’ विजेता हॅरी केन पुन्हा एकदा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत 627 मिनिटे खेळताना त्याने 6 गोल आणि 1 असिस्टची नोंद केली आहे. केनने क्रोएशिया आणि डीआर काँगोविरुद्ध प्रत्येकी दोन गोल केले आहेत, तसेच मेक्सिकोविरुद्ध एक महत्त्वपूर्ण पेनल्टी गोलमध्ये रूपांतरित केली.
जरी नॉर्वेविरुद्ध त्याला विशेष प्रभाव पाडता आला नाही, तरी यापूर्वी अटलांटा येथील याच मैदानावर त्याने डीआर काँगोविरुद्ध दोन गोल केले आहेत. त्यामुळे त्याला रोखणे अर्जेंटिनाच्या बचावफळीसाठी (डिफेन्स) मोठे आव्हान असेल.
रिअल माद्रिदचा स्टार मिडफील्डर ज्यूड बेलिंगहॅम हा या विश्वचषकात इंग्लंडचा सर्वात प्रभावी खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत 574 मिनिटे मैदानात घालवून 6 गोल आणि 1 असिस्टची नोंद केली आहे. बेलिंगहॅमने उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेविरुद्ध दोन गोल करत इंग्लंडला विजय मिळवून दिला आहे. त्याआधी, ‘राऊंड ऑफ 16’ मध्ये मेक्सिकोविरुद्धही त्याने दोन गोल केले होते. त्यामुळे उपांत्य सामन्यातही त्याच्याकडून आणखी एका दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.
इंग्लंडचा युवा विंगर अँथनी गॉर्डनने अद्याप गोल केला नसला, तरी संघाच्या आक्रमणात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गॉर्डनने आतापर्यंत 3 ‘असिस्ट’ (गोलसाठी मदत) दिले आहेत आणि मैदानात 327 मिनिटे घालवली आहेत. नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात बेलिंगहॅमने केलेल्या पहिल्या गोलमध्ये त्याने मदत केली होती, तसेच मेक्सिकोविरुद्ध पेनल्टी मिळवून देण्यातही त्याने भूमिका बजावली होती. त्याचा वेग आणि ‘ड्रिबलिंग’चे कौशल्य अर्जेंटिनाच्या बचावपटूंसाठी (डिफेंडर्स) अडचणी निर्माण करू शकते.
Comments are closed.