नवी मुंबईत मिंधे पुत्राच्या कार्यक्रमात भाडोत्री कार्यकर्त्यांचा गोंधळ, सातशे रुपये ठरवले पण एक पैसाही दिला नाही

मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नवी मुंबईतील कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी आणलेल्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी आज रात्री जोरदार गोंधळ घातला. कार्यक्रमाला येण्यासाठी या तरुणांना प्रत्येकी सातशे रुपये देण्याची ठरवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात एक रुपया न मिळाल्यामुळे संतापलेल्या या भाडोत्री कार्यकर्त्यांनी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहासमोर बोंबाबोंब केली.त्यांना आवरण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यामुळे मिंधे गटाच्या या मेळाव्यातील फुगवलेल्या गर्दीचे बिंग फुटले

वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृह आज सायंकाळी मिंधे गटाचा मेळावा पार पडला. मिंधे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. या मेळाव्याच्या आधी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीसाठी पनवेल, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर येथील कॉलेजच्या मुलांना बोलवण्यात आले होते. त्यांना प्रत्येकी 700 रुपये रोजंदारी ठरवण्यात आली होती. मात्र रॅली विष्णुदास भावे नाट्यगृहा जवळ आल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी या मुलांना ठरलेली रोजंदारी देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या मुलांनी विष्णुदास भावे सभागृहाच्या बाहेरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे निदर्शनास आल्यानंतर वाशी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भाडोत्री कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांची अक्षरशः पाचावर धारण बसली.

Comments are closed.