पाकिस्तानला कर्ज ही दहशतवादासाठी पैसे आहेत

राजनाथ सिंह यांची टिप्पणी, सैनिकांचे केले कौतुक : ‘सिंदूर’ न संपल्याचीही स्पष्टोक्ती

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात भारताने चालविलेल्या सिंदूर अभियानात आपल्या सैन्यदलांनी पाकिस्तानच्या डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकविण्याचा पराक्रम केला आहे. हे अभियान अद्याप थांबलेले नसून केवळ त्याला स्थगिती देण्यात आली आहे. पाकिस्तानने पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे दु:साहस केले, तर त्याचे कंबरडे मोडण्यास आम्ही सज्ज आहोत, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले आहे. संरक्षण विभागाने आयोजित केलेल्या गुजरातमधील एका कार्यक्रमात ते उपस्थित सैनिकांसमोर भाषण करीत होते.

चार दिवसांच्या संघर्षात जे दिसले तो केवळ ‘ट्रेलर’ होता. योग्य वेळ येताच साऱ्या जगाला पूर्ण चित्रपटच दाखविला जाईल. भारताचा अवमान सहन केला जाणार नाही. तसेच दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत क्षमा केली जाणार नाही. पाकिस्तान हा दहशतवादाला पोसणारा देश असून त्याला कर्ज देणे म्हणजे दहशतवादाला पैसा पुरविण्यासारखे आहे, असा स्पष्ट आरोप करत त्यांनी पाकिस्तानला कर्ज देण्याच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निर्णयावर टीका केली.

वायुदलाची प्रशंसा

पाकिस्तान विरुद्धच्या संघर्षात भारताच्या वायुदलाने अतुलनीय पराक्रम गाजविला आहे. पाकिस्तानचे अनेक वायुतळ उद्ध्वस्त करुन त्याने पाकिस्तानच्या वायुदलाची प्रचंड हानी केली. त्यामुळे सिंदूर अभियानाची प्रशंसा केवळ भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्ये आणि त्यांच्या माध्यमांमध्येही होत आहे. वायुदलाने देशाला सन्मानाच्या शिखरावर नेले आहे. यासाठी सारा देश वायुदल प्रमुख अमर प्रीत सिंग यांचा, तसेच त्यांच्या संपूर्ण दलाचा आभारी आहे. पुन्हा प्रसंग आला तर वायुदल अशीच भव्य कामगिरी करुन देशाची मान आणखी उंच करेल, असा साऱ्या देशाला विश्वास आहे, अशी भलावण राजनाथसिंग यांनी केली.

‘ब्राम्होस’चे सामर्थ्य निर्विवाद

ब्राम्होस या भारताच्या क्षेपणास्त्राने या संघर्षात आपली मारकशक्ती आणि सामर्थ्य निर्विवादपणे सिद्ध केले आहे. आज पाकिस्ताननेही या सामर्थ्याची कबुली दिली असून साऱ्या जगात या क्षेपणास्त्राचे नाव झाले आहे. या आमच्या अस्त्राने पाकिस्तानला पूर्णत: निरुत्तर केले. त्यामुळे पाकिस्तानला संघर्ष थांबविण्याची विनंती करावी लागली, असे ब्राम्होसचे कौतुकही राजनाथसिंग यांनी यावेळी केले.

भूजला दिली भेट

राजनाथसिंग यांनी या कार्यक्रमानंतर कच्छ भागातील भूजलाही भेट दिली. भूजमध्ये 2001 प्रचंड भूकंप झाला होता. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले होते. या भूकंपात मृत झालेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तेथे स्मारक स्थापन करण्यात आले आहे. या स्मारकाचे दर्शनही राजनाथसिंग यांनी घेतले. यावेळी आपले विचार व्यक्त करताना त्यांनी पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या कर्जांवर टीका केली. जागतिक वित्तसंस्था पाकिस्तानला कर्ज पुरवितात. पाकिस्तान या पैशाचा उपयोग दहशतवाद्यांना पोसण्यासाठी करतो, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या भारताची नवी युद्धनीती

भारताची युद्धनीती आणि तंत्रज्ञान यांच्यात गेल्या 10 वर्षांमध्ये किती परिवर्तन झाले आहे, याची प्रचिती भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चार दिवसांच्या संघर्षामुळे सर्वांना आली आहे. हा नवा भारत आहे. तो त्याची मानहानी करण्याचा कोणी प्रयत्न केला तर, त्याला सैल सोडणार नाही. तो अत्यंत जोरदार पलटवार करणारच. अपमान गिळून स्वस्थ बसणे आणि शांततेचे अनाठायी गोडवे गाणे अशा कृती तो कधीही करणार नाही. आमच्यासाठी देश सर्वतोपरी असून आमचे प्रत्येक धोरण हे केवळ आणि केवळ देशाला बलवान करण्यासाठीच आहे. देशहितासंबंधी तडजोड केली जाणार नाही, ही भारताची भूमिका त्यांनी भाषणात स्पष्ट केली.

Comments are closed.