संजय राऊत यांचे तुरुंगातील ते 100 दिवस, नरकातला स्वर्ग पुस्तकाची देशात चर्चा! आज प्रकाशन सोहळा

प्रकाशनापूर्वीच मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात चर्चेचा विषय बनलेले शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक आज वाचकांच्या भेटीला येत आहे. प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात हा प्रकाशन सोहळा होणार आहे. या प्रकाशन सोहळय़ाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर भूषवणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
– ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक प्रकाशित झाले नसतानाही केवळ प्रकाशनाच्या बातम्यांनी सत्ताधारी हादरलेत. त्यांनी या पुस्तकाचा धसका घेतला असून प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे व देशभरात पुस्तकाची चर्चा आहे.
भाजपच्या सूडाच्या राजकारणातून ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. 100 दिवस त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगाच्या चार भिंतींच्या आतही त्यांची लेखणी थांबली नव्हती. आपल्याला आलेल्या अनुभवांना त्यांनी शब्दरूप दिले आणि त्यातूनच ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक साकारले.
कादंबरी नव्हे… जळजळीत सत्य
‘नरकातला स्वर्ग’ ही कादंबरी नव्हे, तर जळजळीत सत्य आहे. यातील प्रत्येक प्रसंग सत्यघटनेवर आधारित आहे. सत्ताधाऱ्यांना धडकी भरेल आणि सर्वसामान्यांच्या डोक्यात विचारचक्र भिरभिरेल असा यातील एकेक प्रसंग आहे. निर्दोषांना गुन्हेगार ठरवण्यासाठी जुलमी सिंहासने कोणत्या थराला जाऊ शकतात, किती हीन पातळी गाठू शकतात याचे थरारक चित्रण संजय राऊत यांच्या लेखणीतून या पुस्तकात उतरले आहे. त्यामुळे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिलेली आहे.
– दैनिक सामना आणि न्यू ईरा पब्लिशिंगतर्फे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक शरद तांदळे आणि दैनिक ‘सामना’च्या मार्केटिंग डेव्हलपमेंट विभागाचे नॅशनल हेड दीपक शिंदे हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.
स्थळ – रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी
वेळ – सायंकाळी 6 वाजता
Comments are closed.